Leicestershire pitch penalty: इंग्लंडमध्ये सध्या काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा सुरू असताना लिसेस्टरशायर क्लबवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका आगळ्यावेगळ्या कारणावरून सुरू झालेल्या वादात शिस्तपालन समितीने लिसेस्टरशायर क्लबवर कारवाई केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या चित्रपटाचे शुटिंग भारतासह इंग्लंडमधील काही मैदानांवर करण्यात आलं. या चित्रीकरणादरम्यान खेळपट्टी निकृष्ट दर्जाची झाल्याचं कारण लिसेस्टरशायर क्लबने दिलं होतं. मात्र शिस्तपालन समितीने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळला असून लिसेस्टरशायर संघावर २७ गुणांची पेनल्टी आणि ५००० पाऊंड्सचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
या स्पर्धेत २० ते २३ ऑगस्ट दरम्यान ग्रेस रोड मैदानावर झालेल्या ग्लॅमॉर्गनविरुद्ध झालेल्या काऊंटी सामन्यात खेळपट्टीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप क्रिकेट नियामकाने केला होता. दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात लिसेस्टरशायरने ४२ धावांनी बाजी मारली होती. पण आता निर्णय घेतल्यानंतर, लिसेस्टरशायर संघाला मिळालेल्या गुणांमधून १९ गुण रद्द करण्यात आले आहेत. यासह अतिरिक्त ८ गुण देखील वजा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमकं कारण काय?
तर झाले असे की, लिसेस्टरशायरच्या मैदानावर सौरव गांगुली यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. लिसेस्टरशायरचे मुख्य मैदान रक्षक कॅलम लेविन यांनी सांगितले की, “सामना सुरू होण्याच्या ४ दिवसाआधी मैदानावर बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग ठेवण्यात आले होते. याच कारणास्तव खेळपट्टीवर कव्हर घालणं आणि खेळपट्टीवर आवश्यक काम करणं कठीण झालं होतं. यासह ३५ अंश सेल्सिअस तापमान असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.
या शूटिंगमुळे खेळपट्टीची देखभाल करता आली नव्हती. त्यामुळे सामन्यादरम्यान खेळपट्टीवर पडलेल्या भेगांमुळे चेंडूला कमालीची असमान उसळी मिळत होती. मॅच रेफरी इयन रॅमेज यांनी सामन्याचा अहवाल दिला, त्यावेळी खेळपट्टीवरून चेंडू ४३ वेळा उसळल्याचं सांगितलं. हे मुद्दाम करण्यात आलेलं नसलं, तरीदेखील क्लबकडून निष्काळजीपणा करण्यात आला आहे, हे उघड झालं आहे. त्यामुळे क्लबवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता लिसेस्टरशायर क्लबवर डिव्हिजन वनमधून बाहेर पडण्याचं संकट आहे. या कारवाईमुळे १२ सामन्यांतून ८१ गुणांची कमाई करणाऱ्या लिसेस्टरशायर संघाचं मोठं नुकसान झालं आहे. या शिक्षेविरोधात दाद मागण्यासाठी क्लबकडे १० दिवसांचा अवधी आहे.
