एपी, बर्लिन : लाइपजिगने १० खेळाडूंसह खेळूनही पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत फ्रीबर्गला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत केले आणि जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

सामन्याच्या १९ व्या मिनिटाला मॅक्सिमिलियन एगस्टीनने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत संघाकडे ही आघाडी कायम होती. अशा स्थितीत ५७ व्या मिनिटाला मार्सेल हेस्टनबर्गला लाल कार्ड मिळाल्याने लाइपजिगला १० खेळाडूंसह खेळावे लागले. लाइपजिगकडून ख्रिस्तोफर एनकुंकुने (७६ वे मि.) गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. मग अतिरिक्त वेळेतही निकाल न लागल्याने सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला.

२००९ मध्ये स्थापन झालेल्या लाइपजिगचे हे पहिले जेतेपद आहे. लाइपजिगने गेल्या वर्षी बोरुसिया डॉर्टमंड आणि २०१९ मध्ये बायर्न म्युनिककडून अंतिम सामन्यात पराभव पत्कारला होता.

पेनल्टी शूटआऊट

फ्रीबर्ग                             लीपजिग

निल्स पीटरसन    ✔  (१-१)   ✔ ख्रिस्तोफर एनकुंकु

ख्रिस्तियन गंटर    (X) (१-२)   ✔ विली ऑर्बन

केव्हन श्लोटरबेक   ✔  (२-३)   ✔ डॅनी ओल्मो

एर्मेडिन डेमिरोव्हिच(X) (२-४)   ✔ बेंजामीन हेन्रिकस

स्टेडियममध्ये हिंसाचार; पॅनाथिनाईकोसला जेतेपद

अथेन्स : चाहत्यांच्या हिंसाचार आणि अश्रुधुरामुळे गाजलेल्या ग्रीक चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पॅनाथिनाईकोसने पीएओकेवर १-० असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. जमावाकडून फेकलेल्या सिमेंटच्या तुकडय़ामुळे पेनल्टीवर गोल केलेल्या एटर कँटलापीएड्राच्या हाताला दुखापत झाली. दोन्ही क्लबमधील चाहत्यांना वेगळे ठेवण्यासाठी ७० हजार आसन क्षमता असलेल्या अथेन्स ऑलिम्पिक स्टेडियममधील ४३ हजार तिकिटांची विक्री झाली. याही परिस्थितीत पॅनाथिनाईकोसच्या चाहत्यांनी अंतिम सामन्यापूर्वी पीएओकेच्या चाहत्यांवर हल्ला केला.

क्रोएशियात चाहत्यांवर पोलिसांचा गोळीबार

झाग्रेब : क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथील महामार्गावर फुटबॉल सामन्यावरून परतताना शेकडो चाहत्यांमध्ये झालेल्या संघर्षांदरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन चाहते आणि एक डझन पोलीस अधिकारी जखमी झाले. दिनामो झाग्रेबविरुद्ध सामना गमावल्यानंतर हाजदुक संघाचे चाहते निराश झाले होते. या उग्र जमावाने पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत वाहतूक थांबवली.