‘वैभव सूर्यवंशी हा विलक्षण प्रतिभाशाली खेळाडू आहे. पण तो आता फक्त १५ वर्षांचा आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणताही सामना शेवटचा ठरू शकतो अशी स्पर्धा आहे. त्यामुळे वैभवला स्टार करायची घाई करू नका. त्याला वयाप्रमाणे बागडू द्या. मोठा झाल्यावर तो भारताचा झेंडा गौरवाने फडकावेल’, असं मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू डॅरेल कलिनन यांनी मांडलं. ‘क्रिकइन्फो’ वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात कलिनन यांनी वैभवला जपण्यासंदर्भात आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी अन्य खेळात लहान वयात ऐतिहासिक भरारी घेणाऱ्या खेळाडूंची उदाहरणं दिली आहेत.

जेनिफर कॅप्रियाती १३व्या वर्षी ‘स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड वीकली’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली. १६व्या वर्षी तिने ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावलं. १८व्या वर्षी तिला रिहॅब प्रक्रियेतून जावं लागलं. मनात आत्महत्येचे विचार आल्याचं तिने न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितलं.

आंद्रेआ जागेअरने १६व्या वर्षी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. २१व्या वर्षी खांदा निखळल्यामुळे तिने निवृत्ती घेतली. नीट वागणूक मिळाली नाही असं ती अनेक वर्ष सांगत राहिली.

ट्रेसी ऑस्टिनने १६व्या वर्षी युएस ओपन स्पर्धा जिंकली. मद्यपान करण्याची परवानगी मिळण्याचं जे वय असतं त्याआधीच तिचं करिअर ओढगस्तीला लागलं होतं.

क्रीडाविश्वातली ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. ही उदाहरणं म्हणजे इशाराच आहेत. म्हणूनच वूमन्स टेनिस असोसिएशनने वयोमानपरत्वे काही नियम लागू केले. याअंतर्गत १८ वर्ष पूर्ण होण्याच्या आधी एखादी खेळाडू किती सामने खेळणार याची संख्या निश्चित करण्यात आली. जेनिफरच्या उदाहरणातून बोध घेत संघटनेनं हा निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये अशा स्वरुपाचा नियम करण्याची निकड वैभवच्या निमित्ताने आहे असं कलिनन यांना वाटतं.

‘वैभव सूर्यवंशीच्या निमित्ताने १५ वर्षांचा मुलगा क्रिकेटविश्वाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. प्रतिभाशाली आणि आयपीएल स्पर्धेत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण ही नाण्याची एक बाजू झाली. एक मोठा व्यावसायिक आर्थिक डोलारा त्याच्याभोवती निर्माण होतो आहे. तो आता फक्त बिहार, आयपीएल, भारतीय संघ एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. क्रिकेटमध्ये लहान वयाचे खेळाडू खेळण्याचं हे पहिलंच उदाहरण नाही. पण वैभवची गोष्ट वेगळी आहे. शालेय वयात या मुलाने इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. जगातल्या भल्याभल्या गोलंदाजांना त्याने चोपून काढलं आहे. त्याला रोखायचं कसं यासाठी मोठमोठे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तासनतास घालवत आहेत’.

‘आपण खेळतोय त्याचे परिणाम जाणण्याचं त्याचं वय नाही. म्हणूनच त्याला खेळताना दडपण जाणवत नाही. तो मनमुराद फटकेबाजी करतो. एक अल्लड निरागस मुलगा जो निसर्गदत्त प्रतिभेच्या जोरावर स्वत:ला प्रस्थापित करू पाहतो आहे. मात्र त्याचवेळी सोशल मीडिया त्याच्या प्रत्येक गोष्टीची दखल घेत आहे. त्याच्या घरी भेटायला येणाऱ्यांची रीघ लागते आहे. त्याचं गाव, त्याचं घर हे आता पर्यटन केंद्र होत आहे. वैभव कसा आमच्या ओळखीचा आहे हे सांगत अनेकजण शेखी मिरवत आहेत. १५ वर्षांचा मुलगा सर्वसाधारणपणे शालेय शिक्षण संपवून कॉलेजच्या उंबरठ्यावर असतो. त्याच वयात वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतो आहे. मुलाखती देतो आहे. त्याचे मीम्स तयार होत आहेत. त्याच्याबाबतच्या गोष्टी व्हायरल होत आहेत. चाहते त्याची सही घेऊ लागले आहेत. अनेकजण त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी आतूर आहेत’, असं कलिनन म्हणतात.

‘टी२० क्रिकेट हा मुक्त फटकेबाजीचा फॉरमॅट आहे. वैभव त्याच्या वयाला साजेसं म्हणजेच बिनधास्त खेळतो आहे. त्याच्या मनात आणि खेळात गुंते नाहीयेत. भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळणं हे त्याचं उद्दिष्ट नाहीये. त्याच्या पिढीच्या कोणाचंच हे ध्येय नाही. कदाचित ते खेळतीलही. पण क्रिकेटच्या बरोबरीने जे विश्व त्याच्या आजूबाजूला तयार होत आहे त्याकरता वैभव तयार नाही. मला माझंच एक उदाहरण सांगावंसं वाटतं. दक्षिण आफ्रिकेच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सगळ्यात लहान वयाचा शतकवीर होण्याचा ग्रॅमी पोलॉक यांचा विक्रम मी मोडला. अगदी काही दिवसातच मला पुढचा ग्रॅमी पोलॉक अशी बिरुदावली मिळाली. वैभवच्या बाबतीतही हेच होणार आहे. नेक्स्ट बिग थिंग, पुढचा विराट, पुढचा रोहित असं काहीतरी त्याच्या नावामागे जोडलं जाईल. ही तुलना योग्य नाही. प्रत्येकजण वेगळा असतोय. कुणासारखं तरी होण्याची सक्ती होऊ नये’, असं कलिनन यांना आवर्जून वाटतं.

‘दक्षिण आफ्रिका तुलनेने छोटा देश आहे, मी ज्या काळात खेळलो तो काळ वेगळा होता. वैभव भारतात राहतो. १४० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडिया आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्याने वसिम अक्रम, वकार युनिस आणि इम्रान खान यांचा सामना केला. त्याच्या खेळाचीही समीक्षा झाली. त्याच्या खेळातल्या उणीवांवर बोट ठेवण्यात आलं. पण ही करणारी मंडळी खेळ जाणणारी होती. त्याचं भलं व्हावं असं वाटणारी होती. आता तशी माणसं राहिलेली नाहीत’.

‘प्रत्येक खेळी, प्रत्येक पत्रकार परिषद, लहानसहान हावभाव, प्रत्येक अपयश, मैदानावर चिडल्याचं उदाहरण- वैभवला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागणार आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा आणि बातमी होणार आहे. २४ तास त्याच्यावर लक्ष असणार आहे. क्रिकेटने त्याला सेलिब्रिटी केलं आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य उरणार नाही. त्याची एक छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावले आहेत. कधी कुठला व्हीडिओ अपलोड केला जाईल सांगता येणार नाही’, असं कलिनन यांनी म्हटलं आहे.

‘डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीमध्ये बालपणासंदर्भात चांगलं विवेचन आहे. लहान वयात जडणघडण होते. आपण पुढे जाऊन जे होते त्याचं मूळ बालपणात असतं. वैभवच्या बाबतीत त्याचं बालपण संपलं आहे. त्याने काय करायचं, कुठे जायचं याचा निर्णय व्यासायिक मंडळी घेणार आहेत. कौतुक माणसाला प्रोत्साहन देऊ शकतं पण प्रचंड प्रमाणात टीका, ट्रोलिंग माणसाला नैराश्येत ढकलू शकतं’, असा इशारा कलिनन यांनी दिला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पदार्पणासह वैभव तीन सामने खेळला. त्याला मोठी खेळी करता आली नाही. तिन्ही सामने भारतीय संघ हरला. त्याला संघातून वगळण्यात आलं. इतक्या कमी वयात त्याला भारताची कॅप देणं कसं चुकीचं आहे यावर चर्चा सुरू झाल्या. तो कसा फिट नाही, त्याचं वजन जास्त आहे, तो एकेरी दुहेरी धावा काढू शकत नाही याबद्दल चर्चा सुरू झाल्या. याचा सामना कसा करायचा हे वैभवला माहिती असण्याचं कारण नाही. अपयशाने खचून गेल्यास किंवा त्याचा परिणाम मैदानावर आक्षेपार्ह वागण्यात झाला तर कोण जबाबदार’?

कलिनन पुढे लिहितात, ‘सेलिब्रेटी होण्याचे जसे फायदे असतात तसे खूप सारे तोटेही असतात. तुमचं भलं चिंतणाऱ्या लोकांपेक्षा तुमचं वाईट व्हावं असं वाटणारी मंडळी खूप असतात. अपयश, दडपण यांचा सामना करण्याचं कोणतंही प्रशिक्षण वैभवला मिळालेलं नाही, ते कुणालाच मिळत नाही. लहान मुलाचं पौगंडावस्थेत आणि मग पुरुषात रुपांतर होतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वैभव १५व्या वर्षीच मोठा खेळाडू झाला आहे मात्र शरीररुपात तो अजूनही लहान मुलगाच आहे. तो लगावत असलेले षटकार, त्याची बॅटस्पीड हे सगळं मोठ्या खेळाडूसारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात तो एक लहान मुलगाच आहे’.

‘वैभवची काळजी घ्यायला हवी. एक रसरशीत उमदी प्रतिभा वाया जायला नको. महिला टेनिस संघटनेप्रमाणे क्रिकेटने यासाठी एक प्रारुप तयार करायला हवं. आता तरी त्याचे कुटुंबीय त्याच्याबरोबर जात आहेत. प्रशिक्षक काळजी घेत आहेत. बीसीसीआय, फ्रँचाईज त्याच्यासाठी योजना आखत आहेत. पण एवढं पुरेसं नाही. त्याच्याभोवती एक सुरक्षित कवच वाटावं अशी रचना हवी. क्रिकेटमध्ये कॅप्रियाटीसारखं काही होऊ नये असं वाटतं’.

‘मला असं वाटतं आणि मी जाणीवपूर्वक बोलतो आहे. आता त्याने परीक्षा द्यावी. त्याच्या मित्रांबरोबर परिसरात खेळावं. त्याच्याकडे खूप सारा वेळ आहे. त्याला शरीराने, मनाने मोठं होऊ द्यावं मगच संधी द्यावी. त्याने चाळिशीपर्यंत खेळावं असंच आपल्या सगळ्यांना वाटत आहे. पण आता जे सुरू आहे तसंच चालू राहिलं तर २५व्या वर्षी तो निवृत्त होईल. त्याच्या प्रतिभेला बहरण्यासाठी योग्य वय आणि वेळ असावा. महान होण्याची घाई करू नये. त्याला सर्वसामान्यांप्रमाणे जगता यावं याची काळजी घ्यायला हवी. त्याने मित्रांबरोबर गप्पाटप्पा, कोट्या करत जगायला हवं. शिक्षण संपल्यावर तो क्रिकेट खेळूच शकतो. सगळं काही कॅमेऱ्यासमोर असण्याची आता काहीच गरज नाहीये’, असं कलिनन यांनी परखडपणे म्हटलं आहे.

वैभवला सचिन तेंडुलकरचं मार्गदर्शन मिळावं. क्रिकेटवेड्या देशात लहानवयात स्टारडम मिळाल्यानंतर कसं वागायचं याचं सचिनइतकं दुसरं सर्वोत्तम उदाहरण नाही असं कलिनन सांगतात.