सलग दुसऱ्या वर्षी ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी

एपी, झुरिच

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत

बायर्न म्युनिकचा आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने सलग दुसऱ्यांदा ‘फिफा’च्या सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर वर्चस्व गाजवले. त्याने पॅरिस सेंट-जर्मेनचा लिओनेल मेसी आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह यांच्यावर मात करत या पुरस्कारावर नाव कोरले. मागील महिन्यात मेसीने लेवांडोवस्कीला मागे टाकत विक्रमी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कार पटकावला होता. मात्र, ‘फिफा’च्या पुरस्कारासाठी विविध राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक, तसेच २०० हून अधिक देशांच्या पत्रकारांनी लेवांडोवस्कीला अधिक मते दिली. चाहत्यांनी मेसीला पसंती दर्शवली.

लेवांडोवस्कीने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी करताना जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा बुंडेसलिगामध्ये दोन विक्रमांची नोंद केली. त्याने बायर्नकडून २०२०-२१ हंगामात ४१ गोल, तर २०२१ वर्षांत ४३ गोल करताना बायर्नचे महान खेळाडू गर्ड म्युलर यांचे विक्रम मोडले. ‘‘हे विक्रम मोडणे शक्य आहे का, असे तुम्ही मला काही वर्षांपूर्वी विचारले असते, तर मी थेट नाही असे उत्तरलो असतो. बुंडेसलिगामध्ये इतके गोल करणे मला अशक्य वाटायचे,’’ असे लेवांडोवस्की म्हणाला.

महिलांमध्ये स्पेन आणि बार्सिलोनाची खेळाडू अलेक्सिया पुतेयास ‘फिफा’च्या सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराची मानकरी ठरली. मागील महिन्यात तिनेच महिलांचा बॅलन डी’ओर पुरस्कार मिळवला होता. चेल्सीचे थॉमस टूशेल आणि एमा हेज यांची सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या पुरस्कारासाठी निवड झाली. टूशेल यांच्या मार्गदर्शनात चेल्सीच्या पुरुष संघाने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद, तर हेज यांच्या मार्गदर्शनात चेल्सीच्या महिला संघाने चॅम्पियन्स लीगचे उपविजेतेपद पटकावले.

रोनाल्डोला विशेष पुरस्कार

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम मोडणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला ‘फिफा’कडून विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. रोनाल्डोने पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना १८४ सामन्यांत ११५ गोल केले आहेत. याआधी सर्वाधिक गोलचा विक्रम इराणचा माजी फुटबॉलपटू अली दाईच्या (१०९) नावे होता.

‘फिफा’चा सर्वोत्तम संघ

गोलरक्षक : जिनी डोनारूमा

बचावपटू : डेव्हिड अलाबा, लिओनाडरे बोनूची, रुबेन डियाज

मध्यरक्षक : केव्हिन डी ब्रुएने, जॉर्जिन्हो, एन्गोलो कांटे

आघाडीपटू : ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, रॉबर्ट लेवांडोवस्की, अर्लिग हालंड

सलग दोन वर्षे ‘फिफा’चा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू ठरणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी मला मतदान करणाऱ्या सर्वाचे, तसेच माझ्या संघ-सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. 

– रॉबर्ट लेवांडोवस्की