मर्सिडिजच्या लुईस हॅमिल्टनने जापनीज ग्रां प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावून विश्वविजेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. विश्वविजेत्या शर्यतपटूंच्या तालिकेत हॅमिल्टने २७७ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर त्याचा सहकारी निको रोसबर्ग (२२९) आणि फेरारीचा सेबॅस्टीयन वेटेल (२१८) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. हॅमिल्टनने या जेतेपदासह आर्यटन सेन्ना यांच्या ४१ फॉम्र्युला-वन जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शर्यतीत रोसबर्ग आणि वेटेल यांना दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हॅमिल्टनने १ तास २८ मिनिटे ०६.५०८ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. त्यापाठोपाठ रोसबर्गे १८.६४ सेकंदानंतर, तर वेटेलने २०.८५० सेकंदानंतर शर्यत पूर्ण केली. ‘‘या सर्किटवर आयर्टन यांना शर्यत करताना मी पाहायला यायचो आणि आज येथेच त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करून आनंद झाला आहे,’’ अशी प्रतिक्रीया हॅमिल्टनने दिली.