Zimbabwe vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुलवायोच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या १९ वर्षीय फलंदाज लुआन ड्रे प्रिटोरियस आपल्या फलंदाजीने कहर केला. पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या लुआनने दमदार शतकी खेळी केली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील ६१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या दिग्गजाचा रेकॉर्ड मोडला
लुआन ड्रे प्रिटोरियसने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या दमदार शतकी खेळीसह त्याने दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज ग्रीम पोलॉक यांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. पोलॉक यांनी १९६४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात सर्वात कमी वयात शतक झळकावलं होतं. त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी (१९ वर्ष, ३१७ दिवस) शतक पूर्ण केलं होतं. आता लुआन ड्रे प्रिटोरियसने देखील वयाच्या १९ व्या वर्षी ( १९ वर्ष ९३ दिवस) शतक झळकावलं आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला डावाची हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. अवघ्या ५५ धावांवर दक्षिण आफ्रिकेचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर, पहिलाच सामना खेळत असलेल्या युवा फलंदाजांनी भार आपल्या खांद्यावर घेतला. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ९५ धावा जोडल्या. या भागीदारीच्या बळावर दोघांनी मिळून संघाचा डाव १५० पार पोहोचवला. यादरम्यान पहिलाच सामना खेळत असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने ५१ धावांची खेळी केली. तर लुआन ड्रे प्रिटोरियसने १६० चेंडूत १५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ११ चौकार मारले.
दक्षिण आफ्रिकेने उभारला ४१८ धावांचा डोंगर
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच दिवशी ९ गडी बाद ४१८ धावांचा डोंगर उभारला आहे. पहिलाच सामना खेळत असलेल्या लुआन ड्रे प्रिटोरियसने सर्वाधिक १५३ धावांची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसने ५१ धावा चोपल्या. तर बॉस्क १०० धावांवर नाबाद आहे.