टी -२० क्रिकेट हा असा फॉरमॅट आहे, ज्या फॉरमॅटमध्ये अशक्य वाटणारे सर्व रेकॉर्ड सहज मोडले जातात. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून १७५ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यावेळी असं वाटलं होतं की, हा रेकॉर्ड कुठलाच फलंदाज मोडू शकणार नाही. पण दक्षिण आफ्रिकेचा २० वर्षीय फलंदाज लुआन ड्रे प्रिटोरियसने हा रेकॉर्ड मोडून काढत इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सीएसए टी-२० चॅलेंज स्पर्धेत फलंदाजी करताना टायटन्स संघाकडून खेळताना नाईट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ७९ चेंडूत १८८ धावांची विक्रमी खेळी केली. या विक्रमी खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि १३ गगनचुंबी षटकार खेचले.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने वेगवान द्विशतकी खेळी केली होती. पण त्याने हा रेकॉर्ड वनडे क्रिकेटमध्ये केला होता. प्रिटोरियसकडे हा रेकॉर्ड टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या नावावर करण्याची नामी संधी होती. त्याचं द्विशतक अवघ्या १२ धावांनी हुकलं. पण या खेळीच्या बळावर तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ख्रिस गेलचा टी -२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना १७५ धावांची विक्रमी खेळी केली होती. आता १३ वर्षांनंतर प्रिटोरियसने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यात त्याने नाईट्स संघातील गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. त्याने या डावात २४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून अवघ्या १६ चेंडूत पुढील अर्धशतक पूर्ण करून आपलं शतक पूर्ण केलं. ४० चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर ५८ चेंडूत त्याने १५० धावा पूर्ण केल्या.

प्रिटोरियसच्या या वादळी खेळीच्या बळावर टायटन्स संघाने २० षटकात ३ गडी बाद २६७ धावांचा डोंगर उभारला. ही या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे.