१०,००० हून अधिक धावा, ३५० हून अधिक बळी आणि जवळपास दोन दशकांची शानदार कारकीर्द. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू लियाम डॉसनने अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. या ३६ वर्षीय खेळाडूने तात्काळ प्रभावाने लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एका गौरवशाली पर्वाचा अंत झाला आहे.
हॅम्पशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून दीर्घकाळ खेळलेला डॉसन आता केवळ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येच खेळताना दिसेल. आपली मर्यादित षटकांची कारकीर्द वाढवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. डॉसनने १३ मे रोजी एका निवेदनातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आपल्या निवेदनात त्याने म्हटलं आहे की, त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्याने सहजपणे घेतला नव्हता, परंतु व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द पुढे चालू ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असे त्याला वाटले.
हॅम्पशायरसाठी २०० हून अधिक सामने खेळल्याचा अत्यंत अभिमान आहे आणि गेल्या अनेक वर्षांत अनेक खेळाडूंसोबत काही अविस्मरणीय आठवणी आहेत, असं तो म्हणाला. तो हॅम्पशायरसाठी व्हाईट-बॉल क्रिकेट खेळण्यास आणि संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. २०१४ मध्ये हॅम्पशायरला डिव्हिजन टू मधून बढती मिळवून देण्यात डॉसनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून, हा संघ सलग ११ वर्षे डिव्हिजन वनमध्ये टिकून आहे.
भारताविरूद्ध कसोटीत केलं होतं पदार्पण
लियाम डॉसनने हॅम्पशायरकडून २११ प्रथम-श्रेणी सामने खेळताना १०,००० हून अधिक धावा केल्या आणि ३८० बळी घेतले. त्याने आपल्या कारकिर्दीत १८ शतकंही झळकावली. ही आकडेवारी दर्शवते की तो अनेक वर्षांपासून संघातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक राहिला आहे. डॉसनने इंग्लंडकडून चार कसोटी सामनेही खेळले आहेत. त्याने भारत दौऱ्यादरम्यान कसोटी पदार्पण केलं, नाबाद ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी त्याने केली होती. त्यानंतर तो बराच काळ कसोटी संघाबाहेर असला तरी, गेल्या वर्षी आठ वर्षांनंतर त्याचे इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन केलं.
२०२४ हे वर्ष डॉसनच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय ठरलं. प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यात त्याला ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आलेॉं. त्याने ‘एकूण देशांतर्गत एमव्हीपी’ (Overall Domestic MVP) आणि ‘काउंटी चॅम्पियनशिप वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ हे पुरस्कारही जिंकले. पण, २०२६ हंगामाच्या सुरुवातीला हॅम्पशायरसाठी चार काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळल्यानंतर डॉसनला फारसे यश मिळाले नाही.
त्यानंतर त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. डॉसन ब्लास्ट आणि वन डे कपमध्ये हॅम्पशायरकडून खेळणं सुरू ठेवेल, तसेच मँचेस्टर ओरिजिनल्सकडून ‘द हंड्रेड’मध्येही सहभागी होईल. तो भविष्यात इंग्लंडसाठी पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणेही सुरू ठेवू शकतो.
