टी२० वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड-नेपाळचे संघ आमनेसामने आहेत. या लढतीच्या निमित्ताने इंग्लंडच्या लायम डॉसनचं वर्ल्डकपचा सामना खेळण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. अनेक वर्ष डॉसन इंग्लंड वर्ल्डकप संघाचा भाग होता. मात्र त्याला कधीही अंतिम अकरात स्थान मिळालं नव्हतं.

भारतात २०१६ मध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कार्लोस ब्रेथवेटने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चार षटकार खेचत विजयश्री खेचून आणली. त्यावेळी लायम डॉसन राखीव खेळाडू होता. २०१९ वनडे वर्ल्डकपवेळी इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये मुकाबला जिंकला तेव्हा लायम डॉसन वेगाने सहकाऱ्यांच्या दिशेने धावत सुटला होता. अंतिम अकराचा तो भाग नव्हता. २०२१ टी वर्ल्डकपवेळी तो ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह होता. २०२२ वर्ल्डकपवेळीही तो ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह होता. दशकभरानंतर डॉसनचं वर्ल्डकप सामना खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

कारकिर्दीत पाचव्यांदा डॉसनची इंग्लंडच्या वर्ल्डकप संघात निवड झाली पण अंतिम अकरात स्थान मिळू शकलं नाही. मुंबईत डॉसनचं वर्ल्डकप सामना खेळण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. ३५वर्षीय डॉसन हा इंग्लंड क्रिकेटमधल्या अनुभवी फिरकीपटूंपैकी एक आहे. इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये डॉसनची कामगिरी चांगली होती. याच्या बळावर दहा वर्षात त्याने इंग्लंडचं २९ सामन्यात प्रतिनिधित्व केलं. सातत्याने संघात आतबाहेर होत राहिल्याने २०२३ मध्ये डॉसनने बांगलादेश दौऱ्यावर जायला नकार दिला होता. मात्र त्यानंतर त्याने काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलं.

या दशकभरात आदिल रशीदने इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू म्हणून स्थान प्रस्थापित केलं. शोएब बशीर, डॉम बेस यांनाही संधी मिळाली. मोईन अलीचाही फिरकीपटू म्हणून प्रयोग करण्यात आला. यंदाचा वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत होतो आहे. फिरकीला अनुकूल अशा खेळपट्ट्यांवर इंग्लंडने डॉसनला संधी देण्याचं पक्कं केलं. रशीदच्या बरोबरीने डॉसनला संधी देण्यात आली आहे.

डॉसनने २०१६ मध्ये इंग्लंडसाठी टी२० पदार्पण केलं होतं. दहा वर्षात डॉसन इंग्लंडतर्फे २४ सामनेच खेळला. जगभरातील विविध टी२० लीगमध्ये मिळून डॉसनच्या नावावर २७८ विकेट्स आहेत.