फोटो आठवणींना उजाळा देतात. लिओनेल मेस्सी आणि स्पेनचा लामिन यामाल यांचा एक अनोखा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २००७ मधला हा फोटो असून, युनिसफेच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मेस्सी सहभागी झाला होता. फंडरेझिंग उपक्रमासाठी एका कुटुंबातील बाळाची निवड करण्यात आली होती. फुटबॉलविश्वातील उदयोन्मुख तारा मेस्सी या बाळाला न्हाऊमाखू घालणार असा हा उपक्रम होता.
त्या उपक्रमात छोट्या टबमध्ये बसलेल्या यमालला मेस्सीने आंघोळ घातली. मेस्सीही त्यावेळी साहजिक लहान होता. अफलातून खेळाने त्याने जगभरातल्या फुटबॉलरसिकांना भुरळ घालायला सुरुवात केली होती. ते बाळ म्हणजे यमाल पुढे जाऊन फुटबॉलपटू होईल याची जराही कल्पना कोणालाच नव्हती. त्या फोटोत मेस्सी आणि लहानगा यमाल आनंदाने एकमेकांना न्याहाळत आहेत.
स्पेनच्या संघाने फ्रान्सला नमवत यंदाच्या वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. आज अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात मुकाबला होणार आहे. अर्जेंटिनाने इंग्लंडला नमवलं तर जवळपास २० वर्षांनंतर मेस्सी आणि यमाल प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकतील. ज्या बाळाला आंघोळ घातली तोच मुलगा मोठा होऊन फुटबॉलच्या मैदानात मेस्सीविरुद्ध खेळायला उतरेल.
मेस्सी चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे तर यमाल विशीत आहे. यमालचे बाबा मेस्सीपेक्षा पाच वर्ष लहान आहेत. हा वर्ल्डकप मेस्सी, रोनाल्डो यांच्यासाठी शेवटचा असू शकतो. अशावेळी नव्या दमाचे खेळाडू त्यांची परंपरा चालवण्यासाठी तय्यार आहेत. यमाल त्यांच्यापैकीच एक आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेला यमाल सध्याच्या घडीला फुटबॉलविश्वातल्या चर्चित खेळाडूंपैकी एक आहे. फायनलमध्ये दिमाखदार कामगिरी करून स्पेनला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी तो आतूर आहे. दुसरीकडे चार वर्षानंतर पुन्हा एकदा अर्जेंटिनाला जिंकून देण्यासाठी मेस्सी उत्सुक आहे. विशीतला यमाल आणि चाळिशीतला मेस्सी अशी ही युवा ऊर्जा आणि अनुभव यांची अनोखी जुगलबंदी असेल.
