Lionel Messi Retires From International Football Argentina: फुटबॉलप्रेमींचा लाडका खेळाडू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत मेस्सीने वयाच्या ३९व्या निवृत्ती जाहीर केली. लिओनेल मेस्सीने तीन पानांचं पत्र लिहित आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. वडिलांच्या निधनानंतर केलेल्या पोस्टमध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते. आता त्याने ३१ ऑगस्ट रोजी पोस्ट शेअर करत फुटबॉलला अलविदा केलं आहे.

लिओनेल मेस्सीने पोस्टमध्ये लिहिलं, “अंतिम सामन्याला बराच काळ उलटून गेल्यानंतर मी या निर्णयाचा खूप विचार केला. अखेर सर्वांना सांगू इच्छितो की, मी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेत आहे.

हा निर्णय घेताना मनाला खूप वेदना झाल्या आणि आजही होत आहेत. मात्र, आता हीच योग्य वेळ असल्याचं मला जाणवतंय. मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की, गेल्या काही वर्षांत संघाने जे काही मिळवलं त्याआधीपासूनच मी या संघासाठी आणि या जर्सीसाठी माझं सर्वस्व पणाला लावलं. तुम्हाला आनंदाचे क्षण देण्यासाठी आणि फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा, यासाठी मी नेहमीच पूर्ण ताकदीने लढलो.

आता फार कमी वेळ शिल्लक आहे आणि काही पर्वांचा शेवट होत आहे. त्यापैकी हे एक पर्व संपताना मला खूप वेदना होत आहेत. राष्ट्रीय संघात असणं मला नेहमीच आवडलं, आजही आवडतं आणि भविष्यातही कायम आवडत राहील. मी माझ्याकडचं सर्व काही दिलं आहे. आता देण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. त्याचवेळी माझ्यामागे काही अतिशय प्रतिभावान युवा खेळाडू आहेत, जे या संघात स्थान मिळवण्यास पात्र आहेत.

गेल्या २० वर्षांत दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मैदानावर असताना मला पाठिंबा देणारा आणि उत्साह वाढवणारा चाहत्यांचा तो आवाज मी मिस करेन. आता मी तुमच्यापैकीच एक असेन, बाहेरून संघाला प्रोत्साहन देत आणि कायम पाठिंबा देत राहीन. चांगल्या काळातही आणि वाईट काळातही, विशेषतः वाईट काळात आणखी जास्त.

माझ्या कुटुंबाचेही आभार. या सुंदर पण कठीण प्रवासात त्यांनी नेहमी मला साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभे राहिले. माझ्या कारकिर्दीत ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, त्या प्रत्येक प्रशिक्षकाचे, सहकाऱ्यांचे आणि संघाच्या अधिकाऱ्यांचेही आभार. त्यांच्या सोबत घालवलेल्या असंख्य अविस्मरणीय आठवणी आणि क्षण मी कायम माझ्यासोबत घेऊन जाईन.

माझ्या सहकाऱ्यांसोबत मिळून तुम्हाला स्वप्नवत क्षण अनुभवायला देता आले, याचा समाधान आणि अभिमान घेऊन मी राष्ट्रीय संघाचा निरोप घेत आहे. हे सर्व तुमच्यासोबत अनुभवणं एखाद्या वेड्या स्वप्नासारखं होतं. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम!

मला अर्जेंटिनाचा नागरिक बनवल्याबद्दल देवाचे आभार. हे शब्द मी २१ जुलै रोजी, अंतिम सामन्याच्या दोन दिवसांनंतर लिहिले होते. आता माझ्या वडिलांसोबत जे काही घडलं त्यानंतर मी या निर्णयाबाबत पूर्वीपेक्षाही अधिक ठाम आहे.”

मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण २०२२ मध्ये आला, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने कतारमध्ये प्रतिष्ठित फिफा विश्वचषक जिंकला. १९८६ नंतरचा अर्जेंटिनाचा हा पहिलाच विश्वचषक विजय होता. मेस्सीने या स्पर्धेत सात गोल केले आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

याव्यतिरिक्त, मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२१ आणि २०२४ मध्ये सलग दोनदा ‘कोपा अमेरिका’चे विजेतेपद पटकावले. त्याने संघाला २०२६ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतही नेलं, परंतु स्पेनविरुद्धचा अंतिम सामना गमावल्यामुळे अर्जेंटिनाला रिकाम्या हाताने परतावं लागलं. मेस्सीचा हा सहावा विश्वचषक होता; पुरुष विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होतो.