वृत्तसंस्था, अटलांटा

विश्वविजेत्या अर्जेंटिना संघावर ‘फिफा’चा वरदहस्त असून पंच आणि ‘व्हीएआर’कडून त्यांच्या पक्षात निर्णय दिले जात असल्याची टीका यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत वारंवार करण्यात आली आहे. यावर अर्जेंटिनाचा कर्णधार आणि वलयांकित आक्रमक लिओनेल मेसीने अखेर प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला काहीही सहज मिळालेले नाही. आमच्या यशामागे संघाची गुणवत्ता आणि चार वर्षांची कठोर मेहनत असल्याचे मेसीने स्पष्ट केले.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात एका गोलच्या पिछाडीनंतर अखेरच्या काही मिनिटांत अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन करत २-१ असा विजय मिळवला आणि सलग दुसर्‍यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यंदाच्या विश्वचषकातील बाद फेरीत पिछाडीवरून मुसंडी मारण्याची ही अर्जेंटिनाची दुसरी वेळ ठरली. यापूर्वी त्यांनी इजिप्तविरुद्धही दोन गोलची पिछाडी भरून काढताना शेवटच्या ११ मिनिटांत तीन गोल करत रोमांचक विजय मिळवला होता.

त्या सामन्यानंतर इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी पंचांनी पक्षपात केल्याचा आणि अर्जेंटिनाला अनुकूल निर्णय दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यातही १-१ अशी बरोबरी असताना स्वित्झर्लंडच्या खेळाडूला ‘रेड कार्ड’ मिळाले आणि त्यानंतर सामन्याचे चित्र बदलले. त्यामुळे सामन्यानंतर स्वित्झर्लंडचे प्रशिक्षक मुरात याकिन यांनी पंच आणि ‘व्हीएआर’च्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना केली होती. समाजमाध्यमावरही काही चाहत्यांनी स्पर्धेच्या रचनेवर आणि अर्जेंटिनाला बाद फेरीत तुलनेने दुबळ्या संघांविरुद्ध खेळण्यास मिळाले यावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, मेसीने हे सारे दावे आणि आरोप फेटाळून लावले आहेत.

‘‘गेल्या चार वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या संघांमध्ये आमचाही समावेश आहे. कोणाला आवडो वा न आवडो, आमच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सलग दुसर्‍यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठत आम्ही पुन्हा एकदा जगातील अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवले आहे. आमचे यश योगायोगाने मिळालेले नाही हे यावरून सिद्ध होते. आम्हाला कोणीही काहीही सहज भेट म्हणून दिलेले नाही. आमच्या मेहनतीचे हे फळ आहे,’’ असे मेसी उपांत्य फेरीतील विजयानंतर म्हणाला.

फिफा’चा वरदहस्त असल्याच्या टीकेला मेसीचे प्रत्युत्तर

‘व्हीएआर’च्या युगात पक्षपात अशक्यच -स्कालोनी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनीही पंचांकडून मदत मिळत असल्याचे आरोप फेटाळून लावले. ‘‘अशी चर्चा नेहमीच होत राहील. मात्र, याचा आम्हाला त्रास होत नाही किंवा आम्ही फार लक्षही देत नाही. आजच्या ‘व्हीएआर’च्या युगात पंच पक्षपात करणे शक्य नाही. एका संघाच्या पक्षात निर्णय दिल्यास ते उघडपणे दिसून येईल. त्यामुळे आम्हाला मदत झाल्याचे म्हणणे योग्य नाही,’’ असे स्कालोनी म्हणाले.

खूप कमी संघांना सलग दोन विश्वचषक स्पर्धांत अंतिम फेरी गाठणे शक्य झाले आहे. आमच्या संघाने हे दुर्मीळ यश संपादन केले आहे. आम्ही इंग्लंडविरुद्ध हरलो असतो, तर अनेक लोक टीका करण्यासाठी पुढे आले असते. मात्र, आम्ही त्यांना ती संधी दिली नाही. – लिओनेल मेसी, अर्जेंटिनाचा कर्णधार