दुखापतीमुळे लिओनेल मेस्सी तीन आठवडे मैदानाबाहेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बार्सिलोनाचा हुकमी एक्का असलेल्या लिओनेल मेस्सीच्या मांडीच्या स्नायूची दुखापत आणखी बळावली असून त्याला तीन आठवडे सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्याविना खेळण्याचे बार्सिलोनासमोर आव्हान असेल.

गुरुवारी अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या लढतीत मेस्सीला दुखापतीमुळे ५९व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत एंजल कोरियाने गोल करून अ‍ॅटलेटिकोला सामन्यात १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या बरोबरीमुळे बार्सिलोनाची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

इव्हान रॅकिटीकने ४१व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु कोरियाच्या गोलने सामन्याचे चित्र बदलले. तत्पूर्वी, झालेल्या लढतीत रिअल माद्रिदची सलग १६ सामन्यांत अपराजित राहण्याची घोडदौड व्हिलारिअलने रोखली. ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. मात्र माद्रिदने १३ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. अ‍ॅटलेटिकोचीही (९) चौथ्या स्थानी घसरण झाली असून रिअल बेटिसला नमवणाऱ्या सेव्हिल्लाने (११) दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

‘‘मेस्सीला गमावणे म्हणजे फुटबॉलचा आणि आमचा पराभव आहे. आता आम्हाला इतर पर्याय शोधायला हवेत. लिओ असताना संघाची ताकद दुपटीने वाढते, परंतु त्याच्याशिवायही आम्ही ताकदवान आहोत,’’ असे मत बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी व्यक्त केले.

मेस्सीला विश्रांतीमुळे स्पोर्टिग गिजॉन व सेल्टा व्हिगो यांच्याविरुद्ध ला लिगा स्पध्रेत, तर बोरुसिया मोएंचग्लॅडबॅचविरुद्ध चॅम्पियन्स लीगमध्ये खेळता येणार नाही. तसेच विश्वचषक पात्रता फेरीत पेरू व पॅराग्वेविरुद्धच्या अर्जेटिना संघातही त्याचा समावेश नसेल.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi barcelona striker ruled out for three weeks
First published on: 23-09-2016 at 03:52 IST