Lionel Messi World Record in FIFA WC: लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहित ५६ वर्षांपासून अबाधित असलेला पेले यांचा विक्रम मोडला. वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या अर्जेंटिनाच्या यंदाच्या मोहिमेची दमदार सुरुवात करताना मेस्सीने गोल्सची हॅटट्रिक साधली. मेस्सीच्या वर्ल्डकप इतिहासातील ही पहिलीच हॅटट्रिक ठरली. मेस्सीच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या बळावर, गतविजेत्या अर्जेंटिनाने अल्जेरियाचा ३-० असा दारूण पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली.
मंगळवारी कॅन्सस सिटी स्टेडियमवर अल्जेरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघासाठी पहिला गोल झळकावला. ३८ वर्षीय मेस्सीने सामन्याच्या १७व्या मिनिटाला बॉक्सच्या बाहेरून डाव्या पायाने अप्रतिम फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला. हा त्याचा फिफा विश्वचषक २०२६ मधील पहिला गोल ठरला. या गोलसह मेस्सीने आता फिफा विश्वचषकाच्या पाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने २००६, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ या विश्वचषकांमध्ये गोल नोंदवले आहेत. २०१० च्या स्पर्धेत मात्र त्याला गोल करता आला नव्हता. विश्वचषकाच्या इतिहासात त्याच्या नावावर एकूण आठ असिस्ट्सही आहेत.
मेस्सीचा विश्वविक्रम
मेस्सी इथेच थांबला नाही. त्याने सामन्यात आणखी दोन गोल करत हॅट्ट्रिक साधली आणि विश्वचषकातील आपल्या योगदानाची संख्या २४ वर नेली. त्याच्या खात्यात आता १४ गोल आणि १० असिस्ट्स अशी एकूण २४ गोलमध्ये थेट सहभागाची नोंद झाली आहे.
फिफाच्या आकडेवारीनुसार, विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोलमध्ये सहभागाचा विक्रम यापूर्वी ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांच्या नावावर होता. मेस्सीने २०२२ च्या अंतिम सामन्यात त्या विक्रमाशी बरोबरी साधली होती, तर आता तो विक्रम मागे टाकत विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक प्रभावी खेळाडू म्हणून नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोलमध्ये योगदान करणारे खेळाडू
अल्जेरियाविरुद्ध हॅट्ट्रिक झळकावल्यानंतर लिओनेल मेस्सीने विश्वचषकाच्या इतिहासातील आणखी अनेक दिग्गजांना मागे टाकत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) – २४ (१६ गोल, ८ असिस्ट्स)
पेले (ब्राझील) – २१ (१२ गोल, ९ असिस्ट्स)
मिरोस्लाव क्लोजे (जर्मनी) – १९ (१६ गोल, ३ असिस्ट्स)
रोनाल्डो (ब्राझील) – १९ (१५ गोल, ४ असिस्ट्स)
गर्ड म्युलर (जर्मनी) – १८ (१४ गोल, ४ असिस्ट्स)
अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने तीन गोल करत आपल्या विश्वचषकातील गोल्सची संख्या १६ वर नेली. यासह त्याने फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर कायलिन एम्बाब्पे जर्मनीचा महान गोलस्कोरर ग्रेड मुलर आणि ब्राझीलचा दिग्गज रोनाल्डो नाझारियो यांना मागे टाकलं. याचबरोबर मेस्सीने मिरोस्लाव क्लोजे यांच्या १६ विश्वचषक गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी साधत स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला.
विश्वचषकाच्या इतिहासात १६ गोल आणि ८ असिस्ट्ससह एकूण २४ गोलमध्ये थेट सहभाग नोंदवत मेस्सीने पेलेचा ५६ वर्षांपासून कायम असलेला विक्रम मोडला आणि फिफा विश्वचषकातील सर्वात प्रभावशाली खेळाडू म्हणून आपलं स्थान अधिक भक्कम केलं.
