Lionel Messi Creates History in FIFA World Cup: लिओनेल मेस्सीने शनिवारी आपल्या फिफा विश्वचषक कारकिर्दीत आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडविरूद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात अर्जेंटिनाने १०व्या मिनिटाला गोल केला, तर स्वित्झर्लंडने अनेक प्रयत्नांनंतर अर्जेंटिनाची बचाव फळी भेदत ७२व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला आहे. दरम्यान सामना सुरू होताच केलेल्या गोलनंतर मेस्सीने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने एक अनोखा टप्पा स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गाठला. अॅरोहेड स्टेडियमवर झालेल्या या लढतीच्या १०व्या मिनिटाला मेस्सीने कॉर्नरवरून अचूक चेंडू मारला आणि अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरने दमदार हेडरद्वारे चेंडू जाळ्यात धाडत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मॅक अॅलिस्टरच्या गोलनंतर मेस्सीच्या नावे फिफा विश्वचषकातील मोठ्या विक्रमाची नोंद झाली. १९६६ पासून अधिकृत नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतर विश्वचषकाच्या इतिहासात १० असिस्ट करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
फिफा विश्वचषकात सर्वाधिक असिस्ट करणारे खेळाडू (१९६६ पासून)
१. लिओनेल मेस्सी – अर्जेंटिना – १० असिस्ट
२. डिएगो मॅराडोना – अर्जेंटिना – ८ असिस्ट
३. पियेर लिटबार्स्की – जर्मनी – ७ असिस्ट
४. ग्रेगॉर्ज लाटो – पोलंड – ७ असिस्ट
या गोलमुळे अर्जेंटिनाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे, फिफा विश्वचषक २०२६ मध्ये विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात जलद गोल ठरला. तसेच, या स्पर्धेत प्रथमच स्वित्झर्लंडचा संघ पिछाडीवर पडला. यापूर्वीच्या पाच सामन्यांत त्यांनी केवळ तीन गोल स्वीकारले होते. पण ७३ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडने अखेरीस गोल करत बरोबरी साधली.
या असिस्टसह मेस्सीने विश्वचषक इतिहासातील महान प्लेमेकर म्हणून आपलं स्थान आणखी भक्कम केलं. आता त्याच्या नावावर एकूण १० असिस्ट असून तो या यादीत अव्वल स्थानी एकटाच विराजमान आहे. त्याने अर्जेंटिनाचाच महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (८ असिस्ट) यालाही दोन असिस्टने मागे टाकलं आहे.
वयाच्या ३९व्या वर्षीही लिओनेल मेस्सी फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. गोल आणि असिस्टच्या जोरावर तो अर्जेंटिनाला इतिहासातील चौथं विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्याच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिना १९६२ नंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरण्याच्या प्रयत्नात आहे.
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यापूर्वी अर्जेंटिनाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये केप व्हर्डेविरुद्ध अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाइम) थरारक विजय मिळवला होता. त्यानंतर इजिप्तविरुद्धच्या सामन्यात ०-२ अशा पिछाडीवरून अवघ्या ११ मिनिटांत तीन गोल करत अर्जेंटिनाने अविश्वसनीय पुनरागमन करत विजय मिळवला.
स्वित्झर्लंडवर विजय मिळाल्यास प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होईल. इंग्लंडने याआधी शनिवारी नॉर्वेचा २-१ असा पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान मिळवलं आहे.
