Lionel Messi Threat FIFA World Cup 2026 FBI Security Alert: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा संघ गतविजेता ठरला. अंतिम सामन्यात स्पेन संघाने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला. यासह सलग दुसऱ्यांदा जेतेपद आपल्या नावे करण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न अपुरं राहिलं. संपूर्ण स्पर्धेत अर्जेंटिनाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण दरम्यान आता एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अर्जेंटिनाचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सीला हा २०२६ फिफा विश्वचषकादरम्यान अनेकदा जीवेमारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या एका गोपनीय अहवालात मेस्सीवर स्फोटकांच्या सहाय्याने हल्ला करण्याच्या कटाचा उल्लेख करण्यात आला आहे. या सुरक्षा अहवालात इतर खेळाडू, अधिकारी आणि पंचांनाही धमक्या मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे.

स्पॅनिश वृत्तसंस्था Informacion.esच्या अहवालानुसार, संपूर्ण स्पर्धेदरम्यान अमेरिकेसह सहभागी देशांच्या सुरक्षा यंत्रणांनी एफबीआयच्या समन्वयाखालील नेटवर्कद्वारे दहशतवादी इशारे, हिंसक धमक्या आणि संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवलं. या अहवालात मेस्सी हा सर्वाधिक धमक्या मिळालेला फुटबॉलपटू असल्याचं नमूद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वात गंभीर घटनांपैकी एक घटना डॅलसमध्ये घडल्याचं समोर आलं आहे, जिथे अर्जेंटिनाचा सामना जॉर्डनविरुद्ध झाला होता. वृत्तांनुसार, एका व्यक्तीने डॅलस विमानतळाशी संपर्क साधून दावा केला की तो आणि त्याचे आणखी दोन साथीदार घरगुती बॉम्ब आणि AR-15 रायफल घेऊन स्टेडियमकडे जात आहेत. ही धमकी पोलिस अधिकारी आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंना उद्देशून होती आणि त्यात लिओनेल मेस्सीचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. फक्त मेस्सी नव्हे तर ख्रिस्तियानो रोनाल्डोला देखील अनेक धमक्या देण्यात आल्या होत्या.

मेस्सीविरुद्धचे कथित दहशतवादी कट नेमके काय होते?

पोलिस अहवालांनुसार, मेस्सीला मिळालेल्या धमक्या केवळ सोशल मीडियावरील अपमान किंवा ऑनलाइन ट्रोलिंगपुरत्या मर्यादित नव्हत्या. डॅलस येथील घटनेत संबंधित व्यक्तीने तो आणि त्याचे दोन साथीदार घरगुती स्फोटके आणि AR-15 रायफल घेऊन स्टेडियमकडे जात असल्याचा दावा केला होता. या कथित धमकीत मेस्सीचं नाव लक्ष्य म्हणून विशेष घेण्यात आलं होतं.

याशिवाय, अटलांटामध्ये अर्जेंटिना-इजिप्त सामन्यापूर्वी आणखी एक गंभीर धमकी समोर आली. एक्स (माजी ट्विटर) वरील एका युझरने स्टेडियममध्ये प्रवेश करून आपल्या शरीराला चार बॉम्ब बांधून मेस्सीवर हल्ला करण्याचा इशारा दिल्याचा आरोप आहे. या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली. अटलांटा सामन्यादरम्यान पोलिसांना आणखी एक फोन आला, ज्यात स्टेडियममधील वेगवेगळ्या कचरापेट्यांमध्ये तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर स्फोटक शोध पथके, श्वानपथके आणि K-9 युनिट्सना संपूर्ण स्टेडियमची तपासणी करण्यासाठी तैनात करण्यात आलं.

हे सर्व अहवाल एफबीआय आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल पोलिस कोऑपरेशन यांच्या समन्वयाने चालवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मोहिमेचा भाग म्हणून तयार करण्यात आले होते. या कारवाईत विश्वचषकात सहभागी देशांच्या सुरक्षा संस्था आणि पोलिस दलांचा समावेश होता. स्पर्धेतील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक असल्यामुळे मेस्सी हा सुरक्षा यंत्रणांसाठी विशेष चिंतेचा विषय ठरला होता. खेळाडू, त्यांच्या कुटुंबीयांपासून ते स्पर्धेच्या स्थळांपर्यंत संबंधित सर्व संभाव्य धोक्यांवर अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून होते.