Lionel Messi shares emotional post after father Jorge Messi passes away: लिओनेल मेस्सीने आपल्या दिवंगत वडिलांसाठी केलेल्या भावनिक पोस्टमध्ये फुटबॉल कारकीर्द सुरू ठेवण्याबाबत मनात शंका निर्माण झाल्याची कबुली दिली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या हृदयस्पर्शी संदेशात मेस्सीने लिहिलं की, “वडील सोबत नसताना पुढे कसं चालायचं, हेच मला समजत नाही.”

मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचं ७ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर निधन झालं. जॉर्ज हे केवळ मेस्सीचे वडील नव्हते, तर त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याला योग्य दिशा देण्यात त्यांची मोठी भूमिका होती. त्यांनीच अनेक वर्षे मेस्सीचे एजंट म्हणून काम पाहिलं आणि त्याच्या व्यावसायिक प्रवासाला आकार दिला. इन्स्टाग्रामवरील मोठ्या पोस्टमध्ये मेस्सीने उघड केलं की, यंदाचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्याला सर्वाधिक प्रोत्साहन वडिलांकडूनच मिळालं होतं. त्याला वर्ल्ड कप जिंकून ती ट्रॉफी वडिलांकडे घेऊन जायची होती; मात्र अखेरीस तो शारीरिकदृष्ट्या स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकला नाही आणि त्याला मोठा संघर्ष करावा लागत होता.

बाबा, अजूनही मला विश्वास बसत नाही की तुम्ही मला सोडून गेलात. मन हे सत्य स्वीकारायलाच तयार नाही. आता तुम्हाला पुन्हा कधी पाहू शकणार नाही, आपण पुन्हा कधी बोलू शकणार नाही, ही कल्पनाच माझ्यासाठी असह्य आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप वेदना सहन करत होतात आणि कदाचित हेच तुमच्यासाठी योग्य होतं, पण तुम्ही खूप लवकर निघून गेलात. अजून खूप क्षण आपल्याला एकत्र जगायचे होते.

लिओनेल मेस्सीची वडिलासांठी भावुक करणारी पोस्ट

तुम्ही नेहमी मला शेवटचा वर्ल्ड कप खेळण्यास सांगत होता. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच तुमची तब्येत सर्वात जास्त बिघडली. पहिल्यांदाच तुम्ही माझ्यासोबत एखाद्या मोठ्या स्पर्धेत नसणार होता. आई मला धीर देत होती की तुम्ही बरे व्हाल आणि प्रवास करू शकाल. मी तिला म्हणायचो, ‘आम्ही फायनलपर्यंत पोहोचू, म्हणजे बाबा येऊ शकतील.’

प्रत्येक सामना संपल्यानंतर मी तुमच्या मेसेजची वाट पाहायचो… आणि त्याची उणीव तीव्रपणे जाणवायची. तेव्हाच मला कळलं की परिस्थिती खरंच गंभीर आहे. तरीही मी सतत विचार करत होतो की शक्य तितक्या पुढे जावं, तुम्हाला थोडा वेळ मिळावा आणि तुम्ही किमान एक सामना तरी पाहावा. आम्ही फायनलमध्ये पोहोचलो, पण तुम्ही तिथे नव्हता. मला ती ट्रॉफी जिंकून तुमच्याकडे आणायची होती, तुम्हाला नवी आनंदाची आठवण द्यायची होती. पण मी ते करू शकलो नाही. माझ्या पायांनी साथ सोडली होती. यावेळी मी माझ्या शरीराच्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. मी कधीच पूर्णपणे ठीक नव्हतो.

मी घरी पोहोचलो तेव्हा तुम्हाला वाटत होतं की आम्ही फायनल पेनल्टीवर हरलो. जे काही घडलं त्याबद्दल आपण नीट बोलूच शकलो नाही. तुम्हाला काहीच अनुभवता आलं नाही. आम्ही चॅम्पियन झालो नाही, पण प्रत्येक सामना आम्ही किती मनापासून जगलो, हे तुम्हाला माहीत नाही आणि पुन्हा एकदा, तुम्हीच बरोबर होता — मला मैदानात उतरून खेळायलाच हवं होतं.

हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, कारण हीच एक गोष्ट आहे जी आपण शेवटपर्यंत बोलू शकलो नाही. बाकी सगळं तुम्हाला आधीच माहीत आहे. आपण रोज बोलायचो, आणि माझ्या व्यस्त वेळापत्रकातून जेव्हा शक्य व्हायचं तेव्हा भेटायचो.

तुमच्याशिवाय आता काय करायचं, कसं पुढे जायचं, हेच कळत नाही. मी फक्त फुटबॉल खेळत होतो आणि आता तोही आणखी किती काळ खेळत राहीन, याबद्दल मनात अनेक प्रश्न आहेत. सुरुवातीपासून तुम्ही माझ्या सोबत होतात. शेवटासाठी अगदी थोडंच अंतर बाकी होतं… मग तुम्ही अजून थोडा वेळ थांबला असतात तर आपण दोघांनी मिळून हा प्रवास पूर्ण केला असता ना? तुम्ही का नाही थांबलात?

मला माहीत आहे, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलांना आनंदी पाहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांना कळू न देता मला खेळताना पाहणं, यातच तुमचा खरा आनंद होता…

मी लहान असल्यापासून सगळं असंच होतं. माझ्या प्रत्येक सरावाला मला नेणं, कामावरून येताच मला ट्रेनिंगला घेऊन जाणं. अनेक वेळा मी आईबरोबर जायचो, कारण त्या वेळी तुम्ही कामात असायचात.

अर्थात, माझा एकही सामना तुम्ही कधी चुकवला नाहीत. जितके तणावात तुम्ही माझा सामना पाहताना असायचात, तितकाच मनापासून आनंदही घ्यायचात. फक्त माझं कौतुक मात्र तुम्ही कधी फारसं करायचा नाहीत.

तुम्ही माझ्यासाठी माझे बाबा, मित्र होतास आणि माझा प्रतिनिधीही होतात. प्रत्येक क्षणी जशी व्यक्ती असायला हवी, तसे तुम्ही होतात. तुम्ही कधी चुकला नाहीत, काही गोष्टींवरून वाद झाले, तरी शेवटी तुम्हीच योग्य असायचात. शेवटी सगळं तुमच्या म्हणण्यानुसारच घडायचं.

तुमची खूप आठवण येईल. पण तुम्ही कायम माझ्यासोबत असाल, विशेषतः माझ्या मुलांच्या संगोपनात आणि त्यांच्या शिक्षणात. कारण मला जसं तुम्ही मला घडवलंत, तसंच मी त्यांना शिकवेन आणि घडवेन.

शांतपणे विश्रांती घे, बाबा. वरूनही जशी काळजी तू इथे माझी घेत होतास, तशीच आमची काळजी घेत राहा. प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद.

तुमच्यावर खूप प्रेम आहे, बाबा