ला-लीगा फुटबॉल : पेले यांच्या ६४३ गोलच्या विक्रमाशी मेसीची बरोबरी

२००४मध्ये बार्सिलोनाकडून पदार्पण करणाऱ्या मेसीने ६४३वा गोल साजरा केला.

एपी, बार्सिलोना

एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या पेले यांच्या ६४३ गोलच्या विक्रमाशी लिओनेल मेसीने बरोबरी साधली. मेसीच्या गोलमुळे बार्सिलोनाने शनिवारी मध्यरात्री ला-लीगा फुटबॉलमध्ये व्हॅलेंसिया संघाविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली.

२००४मध्ये बार्सिलोनाकडून पदार्पण करणाऱ्या मेसीने ६४३वा गोल साजरा केला. पेले यांनी १९५७ ते १९७४ दरम्यान सांतोस संघासाठी ६४३ गोल लगावले होते. मेसी हा बार्सिलोना आणि ला-लीगा फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणारा एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.

पेले यांनी ट्वीटद्वारे मेसीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ‘‘ऐतिहासिक कामगिरीबद्दल तुझे अभिनंदन. बार्सिलोनासारख्या एकाच क्लबकडून प्रदीर्घ काळ खेळताना तू यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलीस, त्याबद्दलही शुभेच्छा. एकाच क्लबकडून इतकी वर्षे खेळणे हे फुटबॉलमध्ये आता अभावानेच पाहायला मिळते.’’

सेरी-ए फुटबॉल : रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटसचा विजय

ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत पार्मा संघाचा ४-० असा पराभव केला. एसी मिलानने २८ गुणांसह अग्रस्थान प्राप्त केले असून इंटर मिलान आणि युव्हेंटसने प्रत्येकी २७ गुणांसह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. देजान कुलूसेव्हस्की याने २८व्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर रोनाल्डोने २६व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल करत युव्हेंटसला ३-० असे आघाडीवर आणले. अखेरच्या क्षणी अल्वारो मोराटा याने चौथ्या गोलची भर घालत युव्हेंटसला विजय मिळवून दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lionel messi equalled pele s record of 643 goals zws

ताज्या बातम्या