Lionel Messi Argentina Farewell Match Speech: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी आपला अखेरचा सामना खेळला. निळी जर्सी परिधान करून त्याने बेनिनविरुद्धच्या एका मैत्रीपूर्ण सामन्यात संघाचं नेतृत्व केलं. ब्युनोस आयर्समधील एस्तादियो मास मोनुमेंटलमध्ये मेस्सीने त्याचा अखेरचा सामना खेळला. आपल्या निरोपाच्या सामन्यात मेस्सीने एक गोल केला आणि एका गोलसाठी असिस्ट दिला. अखेरच्या सामन्यात अखेरचा गोल करत एक दिग्गज फुटबॉलपटू म्हणून त्याने निरोप घेतला. या निरोपाच्या भाषणादरम्यान त्याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान काय घडलं, हे सांगितलं.
मेस्सी हा आठ वेळा ‘बॅलन डी’ओर’ (Ballon d’Or) पुरस्कार जिंकणारा खेळाडू असून, त्याने अर्जेंटिनाला २०२२ च्या फिफा विश्वचषकात विजय मिळवून दिला होता. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला त्याने निकोलस ओटामेंडीला गोल करण्यास मदत केली; त्याच्या असिस्टशिवाय तो गोल शक्य झाला नसता. त्यानंतर, ७१ व्या मिनिटाला संघाला पेनल्टी मिळाल्यावर, त्याने चेंडू गोलजाळीच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात मारून गोल केला.
लिओनेल मेसीने २०२६च्या विश्वचषकातील अर्जेंटिनाच्या प्रवासाबाबत सुरू असलेल्या कटकारस्थानांच्या चर्चांवर वक्तव्य केलं. तसेच चाहत्यांनी एकजूट राहून अर्जेंटिनाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं. अर्जेंटिनाच्या या सुपरस्टारने स्टेडियममध्ये उपस्थित भावुक चाहत्यांसमोर अगदी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. त्याच्या संदेशात भावनांपासून ते संघासाठीच्या आवाहनापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होता.
सामना संपल्यानंतर ड्रोन शो आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मेसीला चाहत्यांशी आणि आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. आपल्या भाषणाची सुरुवात करताना मेसीने त्याचे दिवंगत वडील जॉर्ज यांची आठवण काढली. ऑगस्टमध्ये जॉर्ज यांचं निधन झालं होतं. मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेताना आपल्याला दुःख होत असल्याचं म्हटलं. मात्र, मागील विश्वचषकाचा त्याच्यावर आणि संपूर्ण संघावर भावनिक तसेच शारीरिक परिणाम झाल्याचं त्याने सांगितलं. यानंतर त्याने विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत अर्जेंटिनाच्या पोहोचण्याबाबत सुरू असलेल्या विविध कटकारस्थानांच्या चर्चांवर स्पष्ट वक्तव्य केलं.
स्पर्धेतील महत्त्वाच्या क्षणी मेस्सी आणि त्याच्या संघाला अनेकदा अनुकूल निर्णय मिळाले आणि त्यामुळेच ते स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले, असा दावा अनेकांनी केला होता. याशिवाय अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघाबरोबर कट कारस्थान रचण्यात आल्याचं देखील चाहते म्हणत होते.
लिओनेल मेस्सीचं निरोपाचं भाषण
“माझ्याकडे तुमचे आभार मानण्याशिवाय दुसरं काहीच नाही. मी आधी अध्यक्षांनाही सांगितलं होतं की, आपण ज्या कठीण परिस्थितीतून गेलो, अगदी सर्वांत वाईट काळातही तुम्ही मला हार मानू दिली नाही आणि मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, मला आयुष्यभर याच संघासोबत इथे यायला आवडेल. कारण अर्जेंटिनाकडून खेळाडू म्हणून खेळणं ही आयुष्यातील सर्वांत सुंदर गोष्ट आहे.
मला आयुष्यभर इथेच राहायचं आहे, पण सर्व काही अनुभवल्यानंतर आता मला वाटतं की हा प्रवास संपला आहे. मागील विश्वचषक माझ्यासाठी खूपच कठीण होता. माझं स्वप्न आणि संपूर्ण देशाचं पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या आम्ही खूप जवळ आलो होतो. “विश्वविजेता होण्याच्या आम्ही खूप जवळ आलो होतो. त्यात काहीही विचित्र घडलं नव्हतं.”
इंग्लंडविरुद्धचा सामना आमच्यासाठी प्रचंड तणावाचा होता. विश्वचषकानंतर अनेक प्रकारची वक्तव्य आणि वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. भावनिक आणि शारीरिकदृष्ट्याही आम्ही आमच्या मर्यादेपर्यंत पोहोचलो होतो. आम्ही ज्या-ज्या सहकाऱ्यांसोबत खेळलो, त्या सर्वांसोबत मिळून पूर्ण ताकदीने लढलो. आम्ही आयुष्यभर संघर्ष केला, पण जिंकलोही आणि काही वेळा जिंकू शकलो नाही. मात्र, त्या सामन्यात मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं सर्वस्व दिलं, याबद्दल मला अजिबात शंका नाही. इतका वेळ एकत्र घालवलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो.
हे केवळ माझ्यामुळे झालं नाही; तुम्ही हे स्वप्न सत्यात उतरवलं. माझं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यासाठी तुम्ही मला मदत केली. विश्वचषकात, कोपा अमेरिके स्पर्धेत, अंतिम सामन्यांमध्ये आणि आम्ही खेळलेल्या प्रत्येक सामन्यात मैदानात उतरून कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. कारण मला माहीत होतं की, या संघासाठी मला माझं सर्वस्व पणाला लावावं लागेल.
मला काय काय सांगायचं होतं, त्यातील अनेक गोष्टी कदाचित मी विसरलो असेन. पण या क्षणी आता मी तुमच्यापासून दूर जाणार आहे. “भावनांचा इतका उद्रेक होणार आहे की, कदाचित मला हे सगळं काही आठवणारही नाही. मी संपूर्ण देशात खेळलो आहे. प्रत्येक स्पर्धेत खेळलो आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला तुमचं भरभरून प्रेम मिळालं.”
मी अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. या काळात मी जिथे-जिथे गेलो, तिथे स्टेडियममधील वातावरण अप्रतिम होतं. सामना कोणताही असो विश्वचषक असो किंवा कोपा अमेरिका तुम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहिलात. स्टेडियममध्ये येणं, प्रवास करणं, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी दूरवर जाणं किती कठीण असतं, हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्ही हे कायम केलं. आम्ही घरच्या मैदानावर खेळलो किंवा देशाबाहेर, तुम्ही नेहमी आमच्यासोबत होता.
निश्चितच, हा पुन्हा एकदा माझ्या आयुष्यातील आणि माझ्या कारकिर्दीतील सर्वांत दुःखद दिवस असेल. मला तुमची खूप आठवण येईल. पण मी तुमच्या सोबतच असेन, या युवा खेळाडूंना, या नव्या पिढीला आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला पाठिंबा देत राहीन. आपण कायम एकजूट राहू. जेव्हा आपण एकजूट असतो, तेव्हा आपल्यापेक्षा ताकदवान कोणीही नसतो. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. म्हणून आपण एकत्र राहायलाच हवं आणि ही एकजूट कायम टिकवायला हवी. सर्वोच्च ध्येय गाठायचं असेल, तर आपल्याला एकत्र राहावं लागेल. काही लोकांना हा राष्ट्रीय संघ जिंकताना पाहायचा नाही. पण आपल्याला अशा लोकांविरोधातही एकजूट होऊन उभं राहावं लागेल.”
“तुम्ही पाहू शकता की हा संघ नेमका कसा आहे. एक मजबूत संघ नसेल, तर कोणतंही मोठं यश मिळवणं खूप कठीण असतं. म्हणूनच आम्ही आजवर जे काही मिळवलं, ते मिळवू शकलो. खरं सांगायचं तर, मी आज नेहमीपेक्षा खूप जास्त बोलतोय. पण सत्य हेच आहे की, मला इथून जायचंच नाहीये. मला हे मैदान सोडायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला तुमची खूप आठवण येईल.
मी कायम अर्जेंटिनाचाच राहीन. अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. तुमच्या सगळ्यांसोबत माझं स्वप्न पूर्ण करू शकलो, याचा मला खूप अभिमान आहे,” असं मेस्सीने त्याच्या निरोपाच्या भाषणात म्हटलं.
