Lionel Messi Father Jorge Messi Death News: फुटबॉल विश्वातील प्रसिद्ध आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचं वयाच्या अवघ्या ६८ वर्षी निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ते बराच काळ आजाराशी झुंज देत होते. अर्जेंटिनातील रोसारियो या मेस्सीच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अर्जेंटिनातील वृत्तांनुसार, जॉर्ज मेस्सी यांचे शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजता उपचार सुरू असलेल्या एका खासगी क्लिनिकमध्ये निधन झालं. ते दीर्घकाळ एका जुन्या आजारावर उपचार घेत होते.
जॉर्ज मेस्सी हे केवळ लिओनेल मेस्सीचे वडील नव्हते, तर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ होते. बार्सिलोनामध्ये मेस्सीच्या सुरुवातीच्या प्रवासापासून ते करार, प्रायोजकत्व आणि व्यावसायिक बाबींपर्यंत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनामुळे अर्जेंटिना आणि जागतिक फुटबॉलविश्वात शोककळा पसरली आहे. रॉयटर्स आणि एपी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
लिओनेल मेस्सीच्या बालपणीच्या क्लब न्युएल्स ओल्ड बॉईजने शनिवारी अधिकृत निवेदन जारी करत जॉर्ज मेस्सी यांच्या निधनाची माहिती दिली. अर्जेंटिनाच्या सुपरस्टार मेस्सीच्या वडिलांच्या निधनाबद्दल क्लबने शोक व्यक्त केला आहे. पण अद्याप मेस्सी किंवा त्यांच्या कुटुंबाकडून स्वतंत्र अधिकृत निवेदन आलेलं नव्हतं.
क्लबने निवेदनात म्हटलं, “क्लब अट्लेटिको न्युएल्स ओल्ड बॉईज रोसारियो शहरात वयाच्या ६८व्या वर्षी निधन झालेल्या जॉर्ज मेस्सी यांना अत्यंत दु:ख आणि शोकभावनेने श्रद्धांजली अर्पण करतो. ते न्युएल्सचे निष्ठावान समर्थक, व्यावसायिक आणि अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल आंद्रेस मेस्सी यांचे वडील होते.”
क्लबने पुढे म्हटलं, “जॉर्ज हे सर्वात मोठे आधारस्तंभ होते. पत्नी सेलिया कुचित्तिनी यांच्यासह त्यांनी दूरदृष्टी, शिस्त आणि अपार प्रेमाने जगातील महान खेळाडूच्या कारकिर्दीला आकार दिला. माल्विनासमधील सुरुवातीच्या दिवसांपासून ते जागतिक फुटबॉलच्या सर्वोच्च शिखरापर्यंत लिओनेलच्या प्रत्येक पावलामागे त्यांचे शांत पण प्रभावी नेतृत्व आणि सततची साथ होती.”
क्लबच्या संचालक मंडळाने, सदस्यांनी, खेळाडूंनी आणि संपूर्ण न्युएल्स कुटुंबाने सेलिया, लिओनेल, रोड्रिगो, मातीआस, मारिया सोल आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
