लिओनेल मेस्सीच्या गेल्या वर्षी कोलकात्यात झालेल्या ‘गोट टूर’ कार्यक्रमातील गोंधळाबाबत क्रीडा आयोजक सतद्रू दत्ता यांनी प्रथमच सार्वजनिकपणे भाष्य केलं. १३ डिसेंबरला सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात मेस्सी, त्याचा माजी बार्सिलोना सहकारी लुईस सुआरेझ आणि माजी अ‍ॅटलेटिको मॅड्रिड खेळाडू रोड्रिगो डी पॉल हे अवघ्या २५ मिनिटांत स्टेडियममधून निघून गेले होते. कार्यक्रमस्थळी झालेला गोंधळ आणि प्रेक्षकांवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती.

त्या वेळी पश्चिम बंगालचे तत्कालीन क्रीडामंत्री अरूप बिस्वास, जे कार्यक्रमादरम्यान मेस्सीसोबत उपस्थित होते, यांच्यावर नोंदणी नसलेल्या लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिल्याचा आरोप झाला होता. महागडी तिकीटं खरेदी केलेल्या अनेक चाहत्यांमध्ये त्यामुळे मोठी नाराजी पसरली होती. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि काही चाहत्यांनी स्टेडियममधील मालमत्तेचं नुकसानही केलं. सुमारे एक तास चालणारा हा कार्यक्रम गोंधळामुळे वेळेआधीच थांबवावा लागला.

काही तासांनंतर सतद्रू दत्ता यांना कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली होती. जवळपास ३८ दिवस कोठडीत राहिल्यानंतर त्यांची १९ जानेवारी रोजी सुटका झाली. अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये अरूप बिस्वास यांचा टॉलीगंज मतदारसंघातून पराभव झाला, तसेच अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर सतद्रू यांनी या प्रकरणावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिली.

“निवडणुकीत पराभव झाला म्हणजे शिक्षा झाली असं समजू नका. मी बदनामीचा खटला दाखल करेन आणि गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयातही जाईन. शेवटपर्यंत लढेन,” असं त्यांनी फेसबुक स्टोरीवर लिहिलं, अशी माहिती स्पोर्टस्टारने दिली.

कार्यक्रमादरम्यान वारंवार इशारे देऊनही अरूप बिस्वास यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही दत्ता यांनी केला. “मी त्यांना वारंवार सांगत होतो की इथे फोटो काढू नका. पण त्यांनी सत्तेचा वापर करत फोटो काढणं सुरूच ठेवलं. याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. बिस्वास यांचे लोक आत घुसत असताना ते हसत होते. माझं कुणीच ऐकलं नाही. पोलिससुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते,” असंही सतद्रू यांनी म्हटलं.

सतद्रू दत्ता यांनी पुढे सांगितलं की ते लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्या दिवशी संपूर्ण घडलेला प्रकार सविस्तर मांडणार आहेत. “लवकरच पत्रकार परिषद होणार आहे. सगळं सत्य बाहेर येईल. तुम्ही माझा कार्यक्रम उद्ध्वस्त केला. मला जाणीवपूर्वक त्रास दिला. माझी तीन वर्षांची मेहनत आणि संघर्ष वाया घालवला. चाहत्यांची निराशा केली. मला ३८ दिवस तुरुंगात टाकलं. आता माझी वेळ आहे, असं सतद्रू म्हणाले,

त्यांना वाटलं शांत राहिलं की सत्य दडपलं जाईल… माझ्या टीमवर जबरदस्तीने ग्राउंड अ‍ॅक्सेस कार्ड देण्याचा दबाव टाकला गेला. त्यांनी नकार दिल्यावर त्यांनाच मैदानात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना खोलीतच डांबून ठेवलं गेलं. धमक्या, नियंत्रण आणि दबावाचं राजकारण चाललं होतं. त्यांचे लोक फक्त हस्तक्षेप करत नव्हते… त्यांनी माझ्या कार्यक्रमालाच ब्लॅकमेल केलं. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं,” असा गंभीर आरोप सतद्रू यांनी केला.