Lionel Messi Clash with Referee in ARG vs SUI Match: अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचे पंच जोआओ पिन्हेरो यांच्यात शनिवारी फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात मैदानावर शाब्दिक वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडविरूद्ध सामन्यात विजय मिळवत संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण मेस्सी आणि पंचांमध्ये कशावरून वाद झाला, जाणून घेऊया.
१० खेळाडूंसह खेळणाऱ्या स्वित्झर्लंडचा अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाइम) ३-१ असा पराभव करत अर्जेंटिनाने उपांत्य फेरी गाठली. या विजयासह विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाने इंग्लंडविरुद्धच्या हायव्होल्टेज उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं. हा सामना बुधवारी अटलांटा येथे खेळवला जाणार आहे. या विजयामुळे अर्जेंटिनाने १९६२ नंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं आहे. मात्र, सामन्याच्या निकालापेक्षाही अंतिम शिट्टी वाजण्यापूर्वी मेस्सी आणि पंच यांच्यात झालेला वाद हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.
FIFA WC 2026: मेस्सी आणि पंचांमध्ये कशावरून झाला वाद?
पहिल्या हाफमध्ये स्वित्झर्लंडला फ्री-किक मिळाल्यानंतर हा वाद झाला. अर्जेंटिनाच्या बचावभिंतीत (डिफेन्सिव्ह वॉल) उभ्या असलेल्या मेस्सीला, आवश्यक अंतर राखण्यासाठी पंच जोआओ पिन्हेरो यांनी दिलेल्या सूचनांची पद्धत आवडली नाही. त्यानंतर मेस्सीने तात्काळ त्यांना प्रत्युत्तर दिलं. फ्री-किक घेतल्यानंतरही तो पुन्हा पंचांकडे जाऊन त्यांच्याशी बोलताना दिसला.
प्रसारणादरम्यान करण्यात आलेल्या लिप-रीडिंगनुसार, मेस्सी पंचांना म्हणताना दिसत आहे की, “माझ्याशी नीट बोला, अपमानास्पद बोलू नका. मी तुमच्याशी आदरानेच बोललो आहे.” वादाच्या वेळी मेस्सीने शांतता कायम ठेवली. तो हात मागे ठेवूनच पंचांशी संवाद साधताना दिसला. पिन्हेरो यांनीही त्याला कोणतंही कार्ड दाखवलं नाही आणि या शाब्दिक चकमकीचा सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम झाला नाही.
या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातील तो सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला. यानंतर अतिरिक्त वेळेत ज्युलियन अल्वारेझ आणि लॉटारो मार्टिनेझ यांनी गोल करत अर्जेंटिनाला ३-१ असा रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयासह अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आणत उपांत्य फेरीत धडक मारली.
