मियामी : युरोपीय फुटबॉलला आणखी एक मोठा धक्का बसला असून तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीने अमेरिकेतील इंटर मियामी संघाशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जेटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या मेसीचा फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसोबतचा करार या हंगामाअंती संपुष्टात आला. त्यानंतर ३५ वर्षीय मेसी कोणत्या क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेणार याकडे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष होते. माजी संघ बार्सिलोना किंवा पैशाने संपन्न सौदी अरेबियन लीगमधील अल हिलाल संघाशी मेसी करारबद्ध होऊ शकेल अशी चर्चा सुरू होती. मात्र, मेसीने माजी नामांकित फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमची मालकी असलेल्या इंटर मियामी संघाशी करार करण्याचा बुधवारी निर्णय घेतला.




सात बॅलन डी’ओर विजेत्या मेसीने अमेरिकेतील संघाशी करारबद्ध होणे हा युरोपीय फुटबॉलसाठी आणखी एक धक्का आहे. गेल्या काही काळात ख्रिस्तियानो रोनाल्डो, करीम बेन्झिमा यांसारख्या तारांकित खेळाडूंनी युरोपीय क्लब सोडून सौदी अरेबियातील क्लबशी अब्जावधीचा करार केला आहे. जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीत मेसीने युरोपीय फुटबॉलमध्ये ८५३ सामन्यांत ७०४ गोल आणि ३०३ गोलसाहाय्य केले. त्याने एकूण ३८ जेतेपदे पटकावली. त्याने चार वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवले असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १२९ गोल केले आहेत. गतवर्षी अर्जेटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या मेसीवर आता इंटर मियामी संघाला यश मिळवून देण्याची जबाबदारी असेल. इंटर मियामी संघाशी केलेल्या करारामुळे मेसीला भविष्यात या संघाची मालकी मिळवण्याची संधी मिळेल. तसेच मियामी संघामुळे अदिदास आणि अॅपलला मिळणाऱ्या महसुलातील काही भागही मेसीला मिळणार आहे.
मला पुन्हा बार्सिलोनाकडून खेळायला आवडले असते. माझे ते स्वप्न होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी मी विसरलेलो नाही. माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नव्हता. तसे असते तर मी सौदी लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला असता. बार्सिलोनाने माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला होता, पण तो अधिकृत नव्हता. मला पुन्हा करारबद्ध करण्यासाठी बार्सिलोनाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत. त्या क्लबमध्ये अजूनही काही लोक आहेत, ज्यांना माझे पुनरागमन आवडले नसते. बार्सिलोनाशी करार शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यावर मी मियामीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. -लिओनेल मेसी