पुणे : त्याचे पदलालित्य, त्याचे चापल्य, त्याच्यातला रणनीतिज्ञ आणि त्याचे निरागसत्व. सगळ्या सगळ्याबद्दल कायम आदर, प्रेम, आश्चर्यमुग्धता अशा एकत्र दाटणार्या भावना. इंग्रजीतील  ्रल्ल ं६ी या वाक्प्रचारासारख्या. मराठीत यासाठी त्यातल्या त्यात अल्पाक्षरी उद्गार ‘ऑ’ असाच! आणि तोही तसाच. इतरांपेक्षा वेगळा, अनोखा, अद्वितीय, ‘ऑ’ सम हा! ‘लिओनेल मेसी थकला आता’ असे म्हणणार्यांनी तो काय चीज आहे, हे नुकत्याच झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील त्याच्या प्रत्येक सामन्यातील मैदानावरच्या पूर्ण वेळ वावरावेळी पाहिले असेलच. निवृत्त होताना मात्र तो काल प्रांजळपणे लिहिता झाला, ‘वेदना होताहेत हे जाहीर करताना, पण सुरू झालेला अध्याय संपतोच. 

माझ्यामागे काही उत्तम नवीन खेळाडू येताहेत. त्यांना आता संधी मिळायला हवी.’ मेसी म्हणतो, ते खरेच. अर्जेंटिनाला दिएगो मॅरेडोनाच्या महानतेच्या सावलीतून बाहेर पडायला एक दशकाहून अधिक काळ लागला. मेसीने त्यानंतर दोन दशके राज्य केले. अर्जेंटिनासाठी २०७ सामने, १२५ गोल आणि गोलसाठी निर्माण केलेल्या संधी, दिलेले पास तर अनेकानेक. पण, महान खेळाडूंची कामगिरी निव्वळ आकडेवारीच्या पलीकडे असते. 

मेसीचेही तसेच. त्याने अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूंच्या दोन पिढ्यांना प्रेरणा दिली आणि वेगाच्या आवेगात गुरफटलेल्या एकविसाव्या शतकातील फुटबॉलही ‘देखणे’ केले.  म्हणूनच अर्जेंटिनाला कोपा अमेरिका आणि विश्वचषक जिंकून देणारा मेसी अर्जेंटिनाकडून खेळताना आता दिसणार नाही, याची किंचित का होईना टोचणी लागून राहील. त्याने यापूर्वी एकदा २०१६ मध्येही निवृत्ती जाहीर केली होती. पण, फुटबॉल रसिकांचे नशीब, की ती मागे घेऊन तो परतला. हा परतीचा प्रवास वैयक्तिक यशाबरोबरच सांघिक जेतेपदांचा, म्हणून अधिक देदीप्यमान. 

आता परतीची शक्यता नाही. डायरीच्या तीन कागदांवर पेनाने लिहिलेल्या निवृत्ती संदेशात तो म्हणतो, ‘राष्ट्रीय संघासाठी खेळायला मला नेहमीच भावले, भावते, भावत राहील. त्यासाठी मी माझे सर्वस्व दिले. आता मात्र माझ्याकडे देण्यासारखे काही उरले नाही…’ कसे नाही? महान खेळाडूंचा खेळ आठवणीत उरतोच की. कायम त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम आणि आश्चर्यमुग्धता वृद्धिंगत करत. ‘ऑ’ सम हा, अशा उद्गारांसह!