Lionel Messi scores two goals for Inter Miami Video: लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषकानंतर फायनलमधील पराभवानंतर आपल्या क्लबसाठी मैदानावर दणक्यात पुनरागमन केलं आहे. मेस्सीने वर्ल्डकपनंतर पहिले दोन गोल करत इंटर मियामी संघाला शानदार विजय मिळवून दिला. बुधवारी झालेल्या लीग्स कप सामन्यात इंटर मियामीने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत अॅटलेटिको सॅन लुईसचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा सुपरस्टार मेस्सी या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही ठरला.
सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला डेव्हिड रोड्रिग्जने हेडरद्वारे गोल करत सॅन लुईसला आघाडी मिळवून दिली. सॅन लुईसने आघाडी घेतल्यानंतर लिओनेल मेस्सीने लगेच प्रत्युत्तर दिलं. सामन्याच्या ११व्या मिनिटाला त्याने गोल करत इंटर मियामीला बरोबरी साधून दिली. मेस्सीने गोलपोस्टच्या दिशेने धावता धावता आलेल्या असिस्टने डोकं चक्रावणारा गोल केला. यानंतर त्याने पुढे जाऊन बॉल उचलत या गोलचं सेलिब्रेशन केलं. या त्यानंतर ४४व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल करत त्याने मध्यंतरापूर्वीच आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
या दोन गोलसह मेस्सीच्या नावावर आता लीग्स कपमधील १२ सामन्यांत १४ गोल झाले आहेत. त्याने लॉस एंजेलिस एफसीचा आघाडीचा खेळाडू डेनिस बुआंगा (१३ गोल) याला मागे टाकत स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा मान पटकावला आहे.
विश्वचषकानंतर मेस्सी पुन्हा गोलच्या लयीत
२०२६ फिफा विश्वचषकानंतर मेस्सीचा हा दुसराच सामना होता. विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती, मात्र अंतिम सामन्यात स्पेनकडून १-० असा पराभव पत्करावा लागला. ३९ वर्षीय मेस्सीने मागील आठवड्यात कोलंबस क्रूविरुद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून पुनरागमन केलं होतं. त्या सामन्यात त्याला ३७ मिनिटे खेळूनही गोल करता आला नव्हता आणि सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. मात्र सॅन लुईसविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने दोन गोल आणि एक असिस्ट करत आपल्या पुनरागमनाची जोरदार छाप पाडली.
इंटर मियामीची विजयी घोडदौड कायम
इंटर मियामीकडून टेलास्को सेगोव्हिया आणि बचावपटू मिकाएल यांनीही प्रत्येकी एक गोल केला, तर नोश अॅलनने तब्बल तीन गोलसाठी सहाय्य (असिस्ट) नोंदवलं. याशिवाय, पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत मिकाएलच्या गोलसाठी मेस्सीनेच अचूक पास देत असिस्टची नोंद केली. या विजयासह इंटर मियामीचा अपराजित राहण्याचा सिलसिला आता सलग आठ सामन्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, परिसरात विजांचा कडकडाट होत असल्याने एनयू स्टेडियमवरील हा सामना दुसऱ्या हाफमध्ये सुमारे ३० मिनिटं थांबवावा लागला.
