Greatest Footballer of all Time : मुंबई : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रियाविरुद्ध दोन गोल करून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीने या स्पर्धेत सर्वाधिक गोलांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्जेंटिनाच्या पहिल्या साखळी सामन्यात अल्जीरियाविरुद्ध मेसीने हॅटट्रिक रचत जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोसाच्या १६ गोलांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
त्याचा हा विक्रम मोडण्याची संधी फ्रान्सच्या किलियन एम्बापेला नक्कीच आहे. एम्बापेनेही या स्पर्धेत गोलधडाका सुरू केला असून, १६ गोलसह तो मेसीच्या मागावर आहेच. पण मेसीच्या फुटबॉल कारकीर्दीचा पटच इतका विशाल आहे, की त्याच्याशी महानतेच्या बाबतीत बरोबरी करण्यासाठी एम्बापेला आणखी अनेक वर्षे सातत्याने उच्च दर्जाचे फुटबॉल खेळावे लागेल – क्लब आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर.
विश्वचषक स्पर्धेत आजवरचा सर्वाधिक गोल झळकावणारा फुटबॉलपटू ही कामगिरी म्हणजे मेसीच्या झळाळत्या कारकीर्दीत केवळ ‘केकवरील आयसिंग’ ठरते. तसे पाहता त्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातच विश्वचषकात त्याने आणि त्याच्यामुळे अर्जेंटिनाने चमक दाखवण्यास सुरुवात केली. पण २०२२मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर त्याची गणना खऱ्या अर्थाने महान फुटबॉलपटूंमध्ये केली जाऊ लागली. आता तो मुख्य प्रवाहातील क्लब फुटबॉलमध्ये सहभागी होत नाही. पण विश्वचषक स्पर्धेत गोल करण्याची आणि अर्जेंटिनाला अजिंक्यपद मिळवून देण्याची त्याची भूक कमी झालेली नाही हेच सुरुवातीच्या दोन सामन्यांतील त्याच्या कामगिरीने दाखवून दिले. अजूनही या स्पर्धेत काही सामने बाकी आहेत. मेसीचा धडाका पाहता तो किमान पावशतकी विश्वचषक गोलांची मजल मारेल ही शक्यता अवास्तव ठरत नाही.
क्लब फुटबॉलमध्ये अद्वितीय
‘ग्रोथ हार्मोन्स’च्या उपचारासाठी लहानग्या मेसीला अर्जेंटिना सोडून स्पेनमध्ये बार्सिलोना येथे यावे लागले. तो आव्हानात्मक काळ मेसीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. बार्सिलोना क्लबने उपचाराचा खर्च केला, पण त्या बदल्यात मेसीने त्यांच्या युथ अॅकॅडमीतून खेळावे अशी अट घातली होती. त्यानुसार मेसी उपचार घेतल्यानंतर बार्सिलोनाच्या यूथ फुटबॉल अॅकॅडमीत जाऊ लागला आणि फुटबॉल हेच त्याचे जीवन बनून गेले. मेसी आणि बार्सिलोना हे समीकरण बनून गेले. फुटबॉलच्या इतिहासात एकाच क्लबसाठी खेळून कारकीर्द घडवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मेसी त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या उत्तरार्धात फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेनकडूनही खेळला. पण बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याचा खेळ बहरला, फुटबॉलपटू म्हणून त्याची महानतेकडे वाटचाल सुरू झाली.
मेसीच्या बाबतीत एक उल्लेखनीय बाब म्हणजे, त्याच्या पहिल्या टप्प्यात मेसी क्लब फुटबॉलपटू म्हणूनच अधिक ओळखला जायचा. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी अर्जेंटिनाकडून पदार्पण केले खरे, पण पहिल्या साधारण १०-१५ वर्षांमध्ये अर्जेंटिनापेक्षा बार्सिलोनाकडून खेळतानाच त्याचे कौशल्य पणाला लागलेले दिसायचे. अर्जेंटिनाकडून कोणतेही महत्त्वाचे अजिंक्यपद पटकावण्याआधी मेसीने बार्सिलोनासाठी ढीगभर अजिंक्यपदे पटकावली. त्याला त्या भरारीच्या काळात व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वोच्च वैयक्तिक पुरस्कार मानला जाणारा ‘बॅलन डीओर’ पुरस्कारही अनेकदा मिळाला.
पण क्लब फुटबॉलमध्ये तो भरात असताना, अर्जेंटिनाकडून हवी तितकी पदके मिळवत नाही, तेव्हा तो स्वतःपुरता विचार करतो. अर्जेंटिनाकडून खेळताना तितक्याच तन्मयतेने खेळत नाही असे आरोपही त्याच्यावर होऊ लागले. कोपा अमेरिकाच्या दोन अंतिम सामन्यांमध्ये अर्जेंटिनाला पराभूत व्हावे लागले. तेव्हा म्हणजे गेल्या दशकाच्या ऐन मध्यावर मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन टाकला होता. पण अर्जेंटिनातील फुटबॉलवेड्या जनतेने आणि तेथील फुटबॉल संघटनेने त्याला हा विचार बदलायला लावला. त्यानंतर त्याच्या क्लब कारकीर्दीला ओहोटी लागली, तरी मेसी अर्जेंटिनाकडून खेळत राहिला. त्यात एकदा विश्वचषक आणि एकदा कोपा अमेरिका अशी दोन महत्त्वाची अजिंक्यपदे त्याच्या नेतृत्वाखाली आणि खेळामुळे अर्जेंटिनाला पटकावता आली. आता तर ३९व्या वर्षीही मेसीला अर्जेंटिनाला एकूण चौथे आणि सलग दुसरे विश्वविजेतेपद मिळवून द्यायचे आहे.
बक्षिसेच बक्षिसे…
लिओनेल मेसी पेले, मॅराडोना, दोघे रोनाल्डो, झिदान किंवा क्रायुफपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा नाही यावर चर्चा होत राहील. पण एक मात्र खरे, मेसीच्या नावावर जितकी पदके, पारितोषिके आणि बहुमान आहेत तितके या कोणाच्याही नावापुढे नाहीत.
ही यादीच छाती दडपून टाकणारी आहे :
वैयक्तिक
- बॅलन डी ओर – ८
- युरोपियन गोल्डन शू – ६
- फिफा सर्वोत्तम फुटबॉलपटू – ३
- फिफा बॅलन डी ओर – ३
- फिफा विश्वचषक गोल्डन बॉल – २ (२०१४, २०२२)
सांघिक
- सांघिक अजिंक्यपदे – ४६ (अर्जेंटिना, बार्सिलोना, पॅरिस सेंट जर्मेन)
- विश्वचषक – १
- कोपा अमेरिका – १
विक्रम
- कॅलेंडर वर्षात सर्वाधिक गोल – ९१
- एका क्लबसाठी सर्वाधिक गोल – ६७२ (बार्सिलोना)
- स्पॅनिश ला लिगामध्ये सर्वाधिक गोल – ४७४
- फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल – १८
- आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलांसाठी सहाय्य – ६१
- क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी वैयक्तिक आणि सहाय्य मिळून सर्वाधिक गोल – १३२० (९१० गोल अधिक ४१० सहाय्य)
- अर्जेंटिनातर्फे विश्वचषकात गोल झळकावणारा सर्वांत युवा आणि सर्वांत वयस्कर खेळाडू
- बॅलन डी ओर, युएफा चँपियन्स लीग, फिफा विश्वचषक, फिफा विश्वचषक गोल्डन बॉल असे चार प्रतिष्ठित पुरस्कार व अजिंक्यपदे मिळवणारा मोजक्या फुटबॉलपटूंपैकी एक
पेले आणि मॅराडोनापेक्षा श्रेष्ठ?
पेले आणि दिएगो मॅराडोना हे दोघेही महान खेळाडू होते यात शंकाच नाही. पेले यांनी १९५८, १९६२ आणि १९७० या तीन विश्वचषकांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले आणि अजिंक्यपद पटकावले. तीन दशकांमध्ये, तीन विश्वचषक अजिंक्यपद पटकावलेले ते एकमेव फुटबॉलपटू. परंतु पेले हे निव्वळ अत्योत्कृष्ट फुटबॉलपटू होते. त्यांचा गोलधडाका, वेग, चेंडूवरील नियंत्रण आणि ड्रिब्लिंग कौशल्य अचाट होते. पण ते नेतृत्वगुणांसाठी फार ओळखले जायचे नाहीत. शिवाय फुटबॉलमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे गोल सहाय्य कौशल्य त्यांनी फार दाखवले नाही.
दिएगो मॅराडोनाने १९८६मधील विश्वचषक अर्जेंटिनाला अक्षरशः एकट्याच्या जोरावर जिंकून दिला. त्याची मैदानावरील ऊर्जा, फुटबॉल व्यूहरचनेची त्रिमितीय जाण, चेंडूवरील नियंत्रण हेदेखील अफलातून होते. परंतु त्याची कारकीर्द वादातीत नव्हती. इंग्लंडविरुद्ध ‘गोल ऑफ द सेंच्युरी’ झळकावण्याच्या काही मिनिटे आधी त्याने तितकाच वादग्रस्त ‘हँड ऑफ गॉड’ गोल झळकावला होता. त्याच्या गुणवत्तेविषयी वादच नाही. पण त्याची शुचिता डागाळलेली राहिली हे नाकारता येत नाही.
जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबाउर, फ्रान्सचा झिनेदिन झिदान, ब्राझीलचा रोनाल्डो यांनीही त्यांच्या कारकीर्दीत विश्वचषक आणि युरोपियन क्लब अशी दोन सर्वोच्च अजिंक्यपदे पटकावून दाखवली. पण त्यांचे सातत्य मेसीइतके तगडे नाही. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हाही अष्टपैलू आणि गुणवान फुटबॉलपटू आहे. मात्र त्याच्या नावावर विश्वविजेतेपद नाही. त्यामुळे मेसीबरोबर थेट तुलना करताना या घटकाचा विचार करावा लागतो.
फ्रान्सचा किलियन एम्बापे हाच निव्वळ संख्येच्या बाबतीत मेसीची बरोबरी करू शकतो किंवा त्याला मागेही टाकू शकतो. तूर्त मात्र लिओनेल मेसी हा फुटबॉलमधील महानतम, श्रेष्ठतम फुटबॉलपटू ठरतो अशी त्याची आकडेवारी, गोलांची भूक, तंदुरुस्ती आणि इच्छाशक्ती दर्शवते.
siddharth.khandekar@expressindia.com
