लेवांडोवस्कीवर मात करत बॅलन डी’ओरचा मानकरी; चेल्सी वर्षांतील सर्वोत्तम

क्लबपॅरिस : अर्जेंटिना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी विक्रमी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडोवस्की आणि चेल्सीचा जॉर्जिन्हो यांच्यावर मात करत या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. वर्षांतील सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने पटकावला.

फ्रान्स फुटबॉल मासिकाच्या वतीने १९५६ सालापासून वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूला बॅलन डी’ओर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. ३४ वर्षीय मेसीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने जुलैमध्ये ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. देशाचे प्रतिनिधित्व करताना नामांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरली. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.

यंदाचा फुटबॉल हंगाम सुरू होण्यापूर्वी मेसी बार्सिलोना संघ सोडून पॅरिस संघात दाखल झाला. मात्र, त्याआधी त्याने बार्सिलोनासाठीही चांगली कामगिरी केली. २०२१ वर्षांत मेसीने एकूण ४१ गोल केले. त्याने मतदानाच्या सर्वाधिक ६१३ गुणांसह बॅलन डी’ओर पुरस्कार पटकावला.

बायर्न म्युनिक आणि पोलंडचा आघाडीपटू लेवांडोवस्कीला ५८० गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. लेवांडोवस्कीने या वर्षांत ६४ गोल करताना बुंडेसलिगा, क्लब विश्वचषक आणि जर्मन सुपर चषक या स्पर्धा जिंकल्या. चेल्सीकडून खेळताना चॅम्पियन्स लीग आणि इटलीकडून खेळताना युरो चषक जिंकणाऱ्या जॉर्जिन्होने ४६० गुणांसह तिसरे स्थान मिळवले. पाच वेळा बॅलन डी’ओर पुरस्काराचा विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदा सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

अलेक्सिया पुतेयास महिलांमध्ये सर्वोत्तम

स्पेन आणि बार्सिलोनाची खेळाडू अलेक्सिया पुतेयास महिलांमध्ये बॅलन डी’ओर पुरस्काराची विजेती ठरली. तिने या वर्षी ४२ सामन्यांत २६ गोलची नोंद केली. तसेच महिलांच्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात चेल्सीविरुद्धही तिने गोल करत बार्सिलोनाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने सर्वाधिक १८६ गुणांसह हा पुरस्कार मिळवला.

बॅलन डी’ओर पुरस्कार पुन्हा जिंकून मला खूप आनंद झाला आहे. मी आणखी किती वर्षे खेळू शकेन ठाऊक नाही. मात्र, या पुरस्कारामुळे आता मला विविध स्पर्धा जिंकत राहण्यासाठी स्फूर्ती मिळाली आहे. मी बार्सिलोना आणि अर्जेंटिना संघातील माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्याविना मी हा पुरस्कार जिंकू शकलो नसतो.

– लिओनेल मेसी