सिडनी येथील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाचे ३३१ धावांचे आव्हान भारताने सहा गडी आणि दोन चेंडू राखून पूर्ण केले. या विजयात रोहित शर्मा, शिखर धवन, मनिष पांडे आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका निर्णायक ठरली. सुरूवातीला रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी १२३ धावांची शतकी सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मनिष पांडे यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली ९४ धावांची निर्णायक भागीदारी भारताच्या आजच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. मनीषने १२९ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने शिखर धवनसह सलामीला शतकी भागीदारी रचली. धवनने ७८ धावांची खेळी केली तर विराट आठ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि मनिष पांडे यांनी चौथ्या विकेसाठी ९६ धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित शर्मा ९९ धावांवर असताना जॉन हेस्टिंग्जने त्याला बाद केले. त्यामुळे विजयासाठी ३३१ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३५व्या षटकात तीन बाद २३१अशी झाली होती. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मनीष पांडेच्या साथीने भारतीय संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले. मात्र, अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला, त्याने ६४ चेंडूत ३४ धावा केल्या. धोनी बाद झाल्यामुळे हा सामना भारतीय संघाच्या हातातून निसटणार का, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, मनिष पांडेने तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून जॉन हेस्टिंगने ३ आणि मिचेल मार्शने एक बळी मिळवला. तत्पूर्वी या सामन्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मधल्या फळीतला फलंदाज मिचेल मार्श यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३३० धावांची मजल मारली.