नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ५ धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला. भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह आणि अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा यांंनी अखेरच्या तीन षटकात केलेल्या अप्रतीम गोलंदाजीमुळे विजय साजरा करता आला. बुमराह विजयाचा शिल्पकार ठरला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी आठ धावांची आवश्यकता असताना बुमराहने यॉर्कर आणि स्लोअर वन्सच्या अस्त्राने इंग्लंडला घायाळ केले. बुमराहने आपल्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना बुमराहने मोईन अलीला डॉट बॉल टाकून विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. बंगळुरु येथे होणारा अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला १४४ धावांवर रोखले होते. त्यामुळे भारताच्या कमकुवत आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने खूप चांगली सुरूवात देखील केली होती. खरंतर सामन्याच्या १६ व्या षटकापर्यंत सामना इंग्लंडच्या बाजूने होता. पण गोलंदाजीच्या जोरावरही ट्वेन्टी-२० सामने जिंकता येतात याचा प्रत्यय नेहरा आणि बुमराह यांनी दिला. नेहराने इंग्लंडच्या सलामीजोडीला एकाच षटकात माघारी धाडले होते. पण त्यानंतर जो रुट आणि इऑन मॉर्गन या अनुभवी जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱया विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. अमित मिश्राने कर्णधार इऑन मॉर्गनला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्स देखील शून्यावर क्लीनबोल्ड झाला होता. पण मिश्राने टाकलेला चेंडू नो बॉल असल्याचे रिव्ह्यूमध्ये निष्पन्न झाल्याने स्टोक्सला जीवनदान मिळाले. स्टोक्सने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत जोरदार फटकेबाजी सुरू केली. बेन स्टोक्स भारतीय संघासाठी घातक ठरू लागला होता. नेहराने सामन्याच्या १७ व्या षटकात बेन स्टोक्सला चालते करून संघाच्या विजयी आशा पल्लवीत केल्या. मग जसप्रीत बुमराहने केलेली गोलंदाजीने इंग्लंडच्या खेळाडूंना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले. बुमराहने १८ व्या षटकात केवळ तीन धावा दिल्या. नेहराने सामन्याचे १९ वे षटक टाकले. इंग्लंडला १० चेंडूत २१ धावांची गरज होती. जोस बटलरने एक चौकार आणि षटकार ठोकून सामना ६ चेंडूत ८ धावा अशा रंगतदार स्थितीत आणला. बुमराहने निर्णयाक षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जो रुटला(३८) पायचीत केल्याने भारताला इंग्लंडवर दबाव निर्माण करता आला. त्यानंतरचे दोन चेंडू स्लोअर वन्सच्या जोरावर बुमराहने निर्धाव टाकले. मग बुमराहला मोठा फटका मारण्याच्या नादात जोस बटलर क्लीन बोल्ड झाला. पुढील चेंडूवर जॉर्डनने एक धाव घेऊन, मोईन अलीला स्ट्राईक दिली. अखेरच्या चेंडूवर षटकार आवश्यक असताना बुमराहने डावखुऱया अलीच्या ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करून डॉट बॉल काढला आणि भारताने सामना पाच धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, टायमल मिल्स आणि ख्रिस जॉर्डन ट्वेन्टी-२० स्पेशलिस्ट गोलंदाजांनी यावेळी आपल्या स्लोअर वन्स आणि वैविध्यतापूर्ण गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना वेसण घातली होती. इंग्लंडने याही सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पहिली दोन षटके खेळून काढली. त्यानंतर कोहलीने टायमल मिल्सला एक खणखणती षटकार आणि चौकार ठोकून रोमांच आणला. पण पुढच्याच षटकात जॉर्डनच्या स्लोअर वन चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर रैना देखील काही मोठी कामगिरी करू शकला नाही. रैना ७ धावा ठोकून तंबूत दाखल झाला. मोईन अलीने युवराज सिंगला पायची करून भारताला तिसरा धक्का, भारताच्या तीन विकेट्स पडल्या असतानाही दुसऱया बाजून केएल राहुलने आपली फटकेबाजी सुरू ठेवली होती. राहुलने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने फटकेबाजी सुरू ठेवली. मनिष पांडे संयमी फलंदाजी करून खेळपट्टीवर उभा होता. केएल राहुल मोठा फटका मारातना डीप मिड विकेटवर झेलबाद झाला. राहुलने ४७ चेंडूत ७१ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात मनिष पांडेने एक षटकार खेचला, पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो मिल्सने अतिशय हुशारीने टाकलेल्या स्लोअर वन चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. धोनीला शेवटची अवघी तीन षटके खेळायला मिळाली. पण जॉर्डनने चांगली गोलंदाजी करून धोनीला मोठे फटके मारण्यापासून रोखले. तोवर अमित मिश्रा आणि हार्दिक पंड्या धावचीत होऊन माघारी परतले. तर अखेरच्या चेंडूवर धोनी देखील बाद झाला होता.

 

Cricket Score, India vs England

Live Updates
22:28 (IST) 29 Jan 2017
बुमराहने करुन दाखवले..भारताने सामना ५ धावांनी जिंकला
22:26 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी एका चेंडूत ६ धावांची गरज
22:25 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला दोन चेंडूत ७ धावांची गरज
22:24 (IST) 29 Jan 2017
बुम बुम बुमराह, जोस बटलर क्लीनबोल्ड
22:23 (IST) 29 Jan 2017
बुमराहचा सुंदर चेंडू, इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूत ७ धावांची गरज
22:23 (IST) 29 Jan 2017
मोईन अलीकडून धाव, इंग्लंडला विजयासाठी ४ चेंडूत ७ धावांची गरज
22:22 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ५ चेंडूत ८ धावांची गरज
22:21 (IST) 29 Jan 2017
बुमराहच्या पहिल्या चेंडूवर जो रुटची विकेट
22:20 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ६ चेंडूत ८ धावांची गरज
22:19 (IST) 29 Jan 2017
नेहराच्या शेवटच्या चेंडूवर षटकार
22:17 (IST) 29 Jan 2017
जोस बटलरचा स्वेअर लेगवर चौकार
22:16 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला १० चेंडूत २१ धावांची गरज
22:15 (IST) 29 Jan 2017
नेहराच्या गोलंदाजीकडे सर्वांचे लक्ष, पहिला चेंडू यॉर्कर
22:14 (IST) 29 Jan 2017
बुमराहच्या षटकात केवळ ३ धावा, सामना रंगतदार स्थितीत
22:12 (IST) 29 Jan 2017
बुमराहची अप्रतीम गोलंदाजी, पाच चेंडूत केवळ १ धाव
22:10 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला १८ चेंडूत २८ धावांची गरज
22:06 (IST) 29 Jan 2017
भारताला महत्त्वपूर्ण यश, नेहराने घेतली स्टोक्सची विकेट
22:02 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी २४ चेंडूत ३२ धावांची गरज
22:00 (IST) 29 Jan 2017
स्टोक्सचा चौकार, इंग्लंड ३ बाद ११० धावा
21:57 (IST) 29 Jan 2017
१५ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद १०४ धावा
21:56 (IST) 29 Jan 2017
बेन स्टोक्सचा खणखणीत षटकार, भारतावर पराभवाचे सावट
21:52 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ३६ चेंडूत ५२ धावांची गरज
21:52 (IST) 29 Jan 2017
१४ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ९२ धावा
21:50 (IST) 29 Jan 2017
स्टोक्सचा खणखणीत षटकार
21:50 (IST) 29 Jan 2017
बेन स्टोक्सचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार
21:48 (IST) 29 Jan 2017
१३ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ८० धावा
21:45 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ४८ चेंडूत ६८ धावांची गरज
21:45 (IST) 29 Jan 2017
रैनाच्या षटकात ८ धावा, इंग्लंड ३ बाद ७७ धावा
21:41 (IST) 29 Jan 2017
११ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ६९ धावा
21:38 (IST) 29 Jan 2017
बेन स्टोक्सला जीवनदान
21:38 (IST) 29 Jan 2017
अमित मिश्राने घेतली आणखी एक विकेट, पण मिश्राचा चेंडू नो बॉल असल्याचे निष्पन्न
21:35 (IST) 29 Jan 2017
भारताला तिसरे यश, कर्णधार मॉर्गन झेलबाद
21:32 (IST) 29 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ६० चेंडूत ८० धावांची गरज
21:32 (IST) 29 Jan 2017
१० व्या षटकात पाच धावा, इंग्लंड २ बाद ६५ धावा
21:29 (IST) 29 Jan 2017
९ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ६० धावा
21:28 (IST) 29 Jan 2017
जो रुटचे दोन चौकार
21:24 (IST) 29 Jan 2017
रैनाच्या षटकात ६ धावा, इंग्लंड २ बाद ४९ धावा
21:21 (IST) 29 Jan 2017
गोलंदाजीत बदल, सुरेश रैना करतोय गोलंदाजी
21:19 (IST) 29 Jan 2017
मिश्राच्या षटकात ६ धावा, इंग्लंड २ बाद ४३ धावा
21:16 (IST) 29 Jan 2017
गोलंदाजीत बदल, अमित मिश्राला गोलंदाजीसाठी पाचारण
21:14 (IST) 29 Jan 2017
सहाव्या षटकात सात धावा, इंग्लंड २ बाद ३६ धावा
21:13 (IST) 29 Jan 2017
मॉर्गनचा चौकार
21:09 (IST) 29 Jan 2017
५ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद २९ धावा
21:07 (IST) 29 Jan 2017
चहलच्या दोन चेंडूत दोन धावा
21:04 (IST) 29 Jan 2017
४ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद २४ धावा
21:02 (IST) 29 Jan 2017
मॉर्गनकडून बचावाचा पवित्रा
21:01 (IST) 29 Jan 2017
नेहराला हॅट्ट्रीकची संधी
21:01 (IST) 29 Jan 2017
नेहराची अफलातून गोलंदाजी, जेसन रॉय देखील झेलबाद
20:58 (IST) 29 Jan 2017
भारताला पहिले यश, आशिष नेहरच्या गोलंदाजीवर बिलिंग्ज झेलबाद
20:57 (IST) 29 Jan 2017
३ षटकांच्या अखेरीस इंग्लंड बिनबाद २२ धावा