Live

Ind vs NZ: भारताचा डाव ५५७ धावांवर घोषित; किवींची सावध सुरुवात

कोहली-रहाणेची त्रिशतकी भागिदारी भारतीय डावाचे वैशिष्ट्य

मॅरेथॉन खेळीनंतर विराट माघारी

न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात बिनबाद २८ धावा केल्या आहेत. मार्टिन गप्टिल १७ तर टॉम लॅथम ६ धावांवर नाबाद आहेत. न्यूझीलंडचा संघ अद्याप ५२९ धावांनी पिछाडीवर आहे.

कर्णधार विराट कोहलीने भारताचा पहिला डाव ५ बाद ५५७ धावांवर घोषित केला आहे. भारतीय डाव घोषित करण्यात आला, त्यावेळी रोहित शर्मा ५१ धावांवर तर रविंद्र जडेजा १७ धावांवर नाबाद होते. दोन दिवस क्षेत्ररक्षण करुन थकलेल्या किवींना काही षटकांसाठी फलंदाजी देऊन त्यांना हादरे देण्याची कर्णधार कोहलीची योजना होती. मात्र किवी सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजी खेळून काढली.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची ३६५ धावांची भागिदारी हे भारताच्या पहिल्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या दिवशी भारतीय संघ अडचणीत असताना कोहली आणि रहाणेने जबाबदारीने फलंदाजी करत भारताला संकटातून बाहेर काढले. पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय संघ ३ बाद १०० असा अडचणीत सापडला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे कोहलीला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र, दुसऱ्या दिवसाचे पहिले आणि दुसरे सत्र खेळून काढत रहाणे आणि कोहलीने न्यूझीलंडला यश मिळू दिले नाही. बचाव आणि आक्रमणाचा सुरेख मेळ साधत या दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाला सुस्थितीत नेेले.

दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात कर्णधार विराट कोहली द्विशतक झळकावून माघारी परतला. विराट कोहलीने २११ धावांची खेळी साकारली. पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या कोहलीने दुसऱ्या दिवशी द्विशतक साकारले. २० चौकारांच्या मदतीने कोहलीने द्विशतकाला गवसणी घातली. अजिंक्य रहाणेला मात्र द्विशतकाने हुलकावणी दिली. रहाणे १८८ धावा काढून ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रहाणेने १८ चौकारांसह ४ षटकार लगावत महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारी पडले आहेत. भारतीय फिरकीचा मुकाबला करताना दोन्ही कसोटी सामन्यात किवींची फलंदाजी ढेपाळली आहे. आता इंदूरच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज तिसऱ्या दिवशी काय कमाल दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे असेल. पहिल्या दोन्ही कसोटीत भारतीय फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. मात्र तरीही भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडला रोखले होते. तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.  त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

Live Updates
10:35 (IST) 9 Oct 2016
भारताचा डाव घोषित; पहिल्या डावात भारत ५ बाद ५५७, रोहित ५१ तर जडेजा १७ धावांवर नाबाद
10:30 (IST) 9 Oct 2016
१६८ षटकांनंतर भारत ५ बाद ५४२ ; रोहित ३७ तर जडेजा १६ धावांवर नाबाद
10:17 (IST) 9 Oct 2016
१६५ षटकांनंतर ५ बाद ५३३; रोहित ३४ तर जडेजा १० धावांवर नाबाद
9:48 (IST) 9 Oct 2016
अजिंक्य रहाणेचे द्विशतक हुकले; १८८ धावांवर झेलबाद
9:36 (IST) 9 Oct 2016
१५७ षटकांनंतर भारत ४ बाद ५००; रहाणे १८६ तर रोहित १४ धावांवर नाबाद
9:06 (IST) 9 Oct 2016
भारताला चौथा धक्का, विराट कोहली २११ धावांवर बाद
8:21 (IST) 9 Oct 2016
कोहलीचे शानदार द्विशतक, भारत ३ बाद ४४६
8:06 (IST) 9 Oct 2016
१३८ षटकांनंतर भारत ३ बाद ४३६; कोहली १९२, तर रहाणे १५७ धावांवर नाबाद
7:40 (IST) 9 Oct 2016
अजिंक्य रहाणेच्या १५० धावा पूर्ण
7:19 (IST) 9 Oct 2016
कोहली-रहाणेची त्रिशतकी भागिदारी; भारत ३ बाद ४००
7:08 (IST) 9 Oct 2016
१२५ षटकांनंतर भारत ३ बाद ३९१; कोहली १६८ तर रहाणे १३८ धावांवर नाबाद
6:43 (IST) 9 Oct 2016
विराट कोहलीच्या १५० धावा पूर्ण
5:58 (IST) 9 Oct 2016
११६ षटकांनंतर भारत ३ बाद ३५७; कोहली १४८ तर रहाणे १२४ धावांवर नाबाद
5:30 (IST) 9 Oct 2016
११० षटकांनंतर भारत ३ बाद ३३९; कोहली १४१ तर रहाणे ११३ धावांवर नाबाद
5:25 (IST) 9 Oct 2016
१०९ षटकानंतर भारत ३ बाद ३३४, कोहली १३६, रहाणे ११३ धावांवर नाबाद
4:52 (IST) 9 Oct 2016
रहाणेच्या शतकी खेळीत ११ चौकार आणि १ षटकार
4:50 (IST) 9 Oct 2016
अजिंक्य रहाणेचे दमदार शतक
4:38 (IST) 9 Oct 2016
कोहली-रहाणेची २०० धावांची भागिदारी पूर्ण
4:37 (IST) 9 Oct 2016
भारताने गाठला ३०० धावांचा टप्पा, कोहली १२० तर रहाणे ९५ धावांवर नाबाद

Web Title: Live cricket score india vs new zealand 3rd test