भारत कसोटी आणि मालिका विजयाच्या उंबरठय़ावर
उर्वरित आठ फलंदाजांवर दक्षिण आफ्रिकेची भिस्त
फिरकीला अनुकूल जामठाच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या खेळपट्टीने पहिल्याच दिवशी १२ बळी घेत आपले रंग दाखवले होते. कसोटीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा हे ‘बळी’सत्र अधिक तीव्रतेने जाणवले. गुरुवारी तब्बल २० फलंदाजांचे ‘बळी’दान देण्यात आले. त्यामुळे अतिशय नाटय़मय पद्धतीने ही कसोटी भारताच्या बाजूने झुकलेली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर विराजमान असणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त ७९ धावांत कोसळला. त्यानंतर भारताने पाहुण्यांसमोर विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे शुक्रवारी भारत तिसऱ्या कसोटीसह मालिकेवर मोहर उमटवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने स्टियान व्हान झिल (५) आणि नाइट वॉचमन इम्रान ताहीर (८) यांना गमावून २ बाद ३२ धावा केल्या आहेत. तर सलामीवीर डीन एल्गर आणि कर्णधार हशिम अमला अनुक्रमे १० आणि ३ धावांवर खेळत आहेत.
२००४मध्ये मुंबईत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात २० फलंदाज एका दिवसात बाद झाले होते. त्याच ऐतिहासिक घटनेची जामठावर पुनरावृत्ती झाली.
भारताने पहिल्या डावात १३६ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताचा दुसरा डाव फक्त १७३ धावांत गडगडला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकून मालिकेत टिकून राहण्यासाठी आणखी १७३ धावांची आवश्यकता आहे आणि तीन पूर्ण दिवसांचा खेळ बाकी आहे.
खेळपट्टीचे स्वरूप आणि पहिल्या दोन दिवसांतील एकंदर झालेला खेळ पाहता कसोटीचा निकाल तिसऱ्या दिवशी सकाळीच लागण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ गेली नऊ वष्रे परदेशात अपराजित राहिला होता. सध्या ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या आफ्रिकेचा रुबाब बेचिराख होण्याची चिन्हे आहेत.
भारताच्या दुसऱ्या डावात फक्त सलामीवीर शिखर धवन (३९), तिसऱ्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजारा (३१) आणि सहाव्या क्रमांकावरील रोहित शर्मा (२३) यांना मैदानावर तग धरता आला. लेग-स्पिनर इम्रान ताहीरने पाच बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने ३ बळी घेत त्याला साथ दिली.
सकाळच्या सत्रात २ बाद ११ धावसंख्येवरून दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाला प्रारंभ केला. भारताच्या फिरकीने अपेक्षेप्रमाणेच पराक्रम दाखवला. रविचंद्रन अश्विन (५/३२), रवींद्र जडेजा (४/३३) आणि अमित मिश्रा (१/९) या त्रिकुटाने आफ्रिकेला पहिल्या डावातील विक्रमी नीचांकी धावसंख्येवर बाद केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १२व्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. पाहुणा संघ सकाळी फक्त दीड तासात आणि २४.१ षटकांत गारद झाला.

 

धावफलक
भारत (पहिला डाव) : २१५
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : डीन एल्गर त्रि. गो. अश्विन ७, स्टियान व्हान झिल झे. रहाणे गो. अश्विन ०, इम्रान ताहिर त्रि. गो. जडेजा ४, हशिम अमला झे. रहाणे गो. अश्विन १, ए बी डी’व्हिलियर्स झे. आणि गो. जडेजा ०, फॅफ डू प्लेसिस त्रि. गो. जडेजा १०, जे पी डय़ुमिनी पायचीत गो. मिश्रा ३५, डेन व्हिलास त्रि. गो. जडेजा १, सिमॉन हार्मर त्रि. गो. अश्विन १३, कॅगिसो रबाडा नाबाद ६, मॉर्नी मॉर्केल झे. आणि गो. अश्विन १, अवांतर (लेगबाइज १) १, एकूण ३३.१ षटकांत सर्व बाद ७९
बाद क्रम : १-४, २-९, ३-११, ४-१२, ५-१२, ६-३५, ७-४७, ८-६६, ९-७६, १०-७९
गोलंदाजी : इशांत शर्मा २-१-४-०, रविचंद्रन अश्विन १६.१-६-३२-५, रवींद्र जडेजा १२-३-३३-४, अमित मिश्रा ३-०-९-१
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. अमला गो. मॉर्केल ५, शिखर धवन झे. व्हिलास गो. ताहीर ३९, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. डय़ुमिनी ३१, विराट कोहली झे. डू प्लेसिस गो. ताहीर १६, अजिंक्य रहाणे झे. डय़ुमिनी गो. ताहीर ९, रोहित शर्मा झे. एल्गर गोल. मॉर्केल २३, वृद्धिमान साहा झे. अमला गो. ताहीर ७, रवींद्र जडेजा त्रि. गो. हार्मर ५, रविचंद्रन अश्विन पायचीत गो. मॉर्केल ७, अमित मिश्रा त्रि. गो. ताहीर १४, इशांत शर्मा नाबाद १, अवांतर (बाइज ८, लेगबाइज ५, नोबॉल ३) १६, एकूण ४६.३ षटकांत सर्व बाद १७३
बाद क्रम : १-८, २-५२, ३-९७, ४-१०२, ५-१०८, ६-१२२, ७-१२८, ८-१५०, ९-१७१, १०-१७३
गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल १०-५-१९-३, सिमॉन हार्मर १८-३-६४-१, कॅगिसो रबाडा ५-१-१५-०, जे पी डय़ुमिनी २-०-२४-१, इम्रान ताहीर ११.३-२-३८-५
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : डीन एल्गन खेळत आहे १०, स्टियान व्हान झिल झे. रोहित गो. अश्विन ५, इम्रान ताहीर पायचीत गो. मिश्रा ८, हशिम अमला खेळत आहे ३, अवांतर (बाइज ४, लेगबाइज १, नोबॉल १) ६, एकूण १४ षटकांत २ बाद ३२
बाद क्रम : १-१७, २-२९
गोलंदाजी : इशांत शर्मा ३-१-६-०, आर. अश्विन ६-२-१२-१, रवींद्र जडेजा ४-२-६-०, अमित मिश्रा १-०-३-१

जोहान्सबर्गमधील खेळपट्टीविषयी मी कधीही तक्रार केली नाही. त्या कसोटीतील कामगिरीनंतर मला वर्षभरासाठी संघातून डच्चू मिळाला, मात्र तरीही तिथे खेळायला माझा आक्षेप नाही. स्विंग गोलंदाजीला अनुकूल ट्रेंटब्रिजच्या खेळपट्टीविषयी मी काहीही बोललो नाही. त्यामुळे फिरकी आणि असमान उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीविषयी तक्रार करण्याचे काहीही कारण नाही. फिरकीपटूंचा सामना कसा करायचा, हे फलंदाजांच्या तंत्रकौशल्यावर अवलंबून आहे. दिलेल्या खेळपट्टीवर खेळणे हे माझे काम आहे. ते मी चोखपणे केले.
– रविचंद्रन अश्विन, भारताचा फिरकीपटू

अफलातून कामगिरीसाठी भारतीय संघाला श्रेय द्यायला हवे. आपल्या खेळाला अनुकूल अशा खेळपट्टय़ा त्यांनी तयार केल्या आहेत. भारतीय फिरकीपटूंनी अचूक मारा करत आमच्या डावाला खिंडार पाडले. खेळपट्टीविषयी आम्ही तक्रार करणार नाही. या कसोटीत अचंबित करणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. जिंकत असताना खेळपट्टीवर टीका करणे सोपे असते, मात्र हरताना ते करणे कठीण आहे. आम्ही या सामन्यात प्रचंड पिछाडीवर आहोत. मात्र आम्ही आशा सोडलेली नाही.
 रसेल डोमिंगो, दक्षिण आफ्रिका प्रशिक्षक