रहाणेची झुंजार फलंदाजी; भारत पहिल्या दिवसअखेर ७ बाद २३१; डेन पीटचे ४ बळी
आघाडीच्या फळीतील दिग्गज फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, मात्र अजिंक्य रहाणेने खेळपट्टीवर ‘टिकून रहा(णे).. टिकून रहा(णे)..’ हेच ध्येय जोपासले. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर ७ बाद २३१ धावा केल्या. यात चिवट झुंज देत फलंदाजी करणाऱ्या रहाणेचे नाबाद ८९ धावांचे योगदान होते.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र आघाडीच्या फलंदाजांना या निर्णयाला न्याय देता आला नाही. पण रहाणेने भारताचा डाव सावरून १५५ चेंडूंचा सामना करीत ९ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने आपली खेळी साकारली. आता कसोटी कारकीर्दीतील पाचव्या शतकापासून तो ११ धावांच्या अंतरावर आहे. याव्यतिरिक्त कोहलीने घरच्या मैदानावर ४४ धावा केल्या. खराब प्रकाशामुळे गुरुवारी सहा षटके आधीच खेळ थांबवण्यात आला, तेव्हा रहाणेसोबत रविचंद्रन अश्विन ६ धावांवर खेळत होता.
भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला तो फिरकी गोलंदाज डेन पीटने. चालू मालिकेत प्रथमच कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या पीटने ३४ षटकांत १०१ धावांत ४ बळी घेत आपली छाप पाडली. वेगवान गोलंदाज कायले अ‍ॅबॉटने २३ धावांत ३ बळी घेतले.
समोरील बाजूने एकेक फलंदाज बाद होत असतानाही रहाणेने आपली एकाग्रता ढळू दिली नाही. मायदेशात पहिलेवहिले अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेचे कसोटी कारकीर्दीतील हे आठवे अर्धशतक. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजाने झळकावलेले हे तिसरे अर्धशतक ठरले. याचप्रमाणे चालू मालिकेतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
भारताकडून दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या झाल्या. रहाणेने कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली, तर रवींद्र जडेजा (२४) सोबत सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. रहाणेने पीटवर तुफानी हल्ला चढवून ९१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने पीटच्याच गोलंदाजीवर दोन षटकार मारले. जडेजानेही रहाणेकडून धडे घेत आत्मविश्वासाने फलंदाजी केली. अ‍ॅबॉटने जडेजाचा अडसर दूर केला. डीन एल्गरने मिड-विकेटला त्याचा सुरेख झेल टिपला.
रहाणेने ७४ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर इम्रान ताहीरला मिड-विकेटला चौकार खेचून भारताला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला, मग तिसऱ्या चेंडूवर मिड-ऑनला आणखी एक चौकार पेश केला.
अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या कर्णधार कोहलीची खेळी पीटने संपुष्टात आणली. रोहित शर्मा चुकीचा फटका खेळून तंबूत परतला. मात्र मोहाली आणि नागपूरच्या खेळपट्टीपेक्षा नवी दिल्लीच्या फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी फिरकीचे नंदनवन नसल्याचे पहिल्या दिवसाने तरी सिद्ध केले.

धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. अमला गो. पीट १२, शिखर धवन पायचीत गो. पीट ३३, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. अ‍ॅबॉट १४, विराट कोहली झे. व्हिलास गो. पीट ४४, अजिंक्य रहाणे खेळत आहे ८९, रोहित शर्मा झे. ताहीर गो. पीट १, वृद्धिमान साहा त्रि. गो. अ‍ॅबॉट १, रवींद्र जडेजा झे. एल्गर गो. अ‍ॅबॉट २४, आर. अश्विन खेळत आहे ६,
अवांतर (बाइज ४, नोबॉल ३) ७, एकूण ८४ षटकांत ७ बाद २३१.
बाद क्रम : १-३०, २-६२, ३-६६, ४-१३६, ५-१३८, ६-१३९, ७-१८९.
गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल १७-५-४०-०, कायले अ‍ॅबॉट १७-६-२३-३, डेन पीट ३४-५-१०१-४, इम्रान ताहीर ७-१-३६-०, डीन एल्गर ५-०-१५-०, जीन-पॉल डय़ुमिनी ४-०-१२-०.