विशाखापट्टणम येथील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ २१५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. आता विजयासाठी भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारतीय फलंदाजांनी चांगली सुरूवात केली आहे. मात्र एक सिक्स मारताच रोहित शर्माची विकेट घेण्यात अकिला धनंजयाला यश मिळाले. मागच्या मॅचमध्ये रोहितने केलेली द्विशतकी खेळी सगळ्यांच्याच लक्षात आहे. आज मात्र त्याला मोठी मजल मारता आली नाही. या सामन्यात श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक थोड्याच वेळापूर्वी पूर्ण केले. त्याच्यापाठोपाठच शिखऱ धवननेही अर्धशतक पूर्ण केले.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. या विजयासह श्रीलंकेने १- ० अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीमुळे मिळालेला दिमाखदार विजय मिळवता आला आणि भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज विशाखापट्टणम येथे रंगणार असून या मैदानात भारताचेच पारडे जड मानले जात आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव पत्कारल्यानंतर भारताने मायदेशात एकही मालिका गमावलेली नाही. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ मात्र भारताविरुद्ध पहिलीवहिली एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी भारतामध्ये आठ मालिका गमावल्या आहेत, तर एक मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले आहे. विशाखापट्टणम्च्या मैदानावर भारतीय संघ ७ सामने खेळला असून, यापैकी एकदाच सामना गमावला आहे, तर एक सामना पावसामुळे अपूर्ण राहिला. भारतीय संघ या मैदानावरील अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता.

UPDATES:

* उपुल थरंगाचा अडथळा दूर, महेंद्रसिंग धोनीच्या चपळ यष्टीरक्षणाने थरंगा माघारी

* सलामीवीर उपुल थरंगा फॉर्मात, हार्दिक पंड्याच्या एकाच षटकात पाच चौकारांची बरसात

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल

श्रीलंका : दनुष्का गुणतिलका, उपुल थरंगा, संदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशान डिक्वेला (यष्टीरक्षक), असीला गुणरत्ने, थिसारा परेरा (कर्णधार), सचिथ पथिराणा, सुरंगा लकमल, अकिला धनंजया, न्यूवान प्रदीप