scorecardresearch

IPL 2017, MI vs RPS: रोहितची झुंज अपयशी, चुरशीच्या लढाईत पुण्याचा ३ धावांनी विजय

बेन स्टोक्सची महत्त्वपूर्ण कामगिरी

IPL 2017 , MI vs RPS
IPL 2017 Live Score, MI vs RPS: आयपीएल सामन्याचे अपडेट्स

सलग सहा विजयांनंतर मुंबई इंडियन्सला सोमवारी पुण्याविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. वानखेडेवर रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने ३ धावांनी विजय प्राप्त केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची झुंज अपयशी ठरली. रोहितने ३९ चेंडूत ५८ धावांची खेळी साकारली. अखेरच्या ६ चेंडूंमध्ये विजयासाठी १७ धावांची मुंबईला गरज असताना पुण्यासाठी जयदेव उनाडकटने अचूक मारा करत तीन विकेट्स घेऊन मुंबईला १५७ धावांवर रोखले. पुण्याविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सामन्याची नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने पुण्याला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पुण्याकडून रहाणे आणि त्रिपाठी यांनी चांगली सुरूवात केली होती. पण उत्तरार्धात मुंबईने पुण्यावर चांगलाच वचक ठेवलेला पाहायला मिळाला. वीस षटकांच्या अखेरीस पुण्याला ६ बाद १६० धावा करता आल्या आहेत. वानखेडेवरील मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहता पुण्याचे आव्हान कमकुवत ठरणारे होते. वानखेडेवर मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना सामने जिंकले आहेत. त्यामुळे सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात असताना पुण्याकडन बेन स्टोक्सने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही कमालीची कामगिरी करत साममना खेचून आणला. स्टोक्सने ४ षटकांमध्ये २१ धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स घेतल्या, तर उनाडकटनेही मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केले.

मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या कर्ण शर्मा याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कर्ण शर्माने अजिंक्य रहाणे(३८) याला बाद केले, तर त्रिपाठी(४५) याचीही विकेट त्याने घेतली. स्मिथला चांगला सुर गवसत असतानाच त्याने विकेट टाकली. हरभजनने आपल्या फिरकीच्या जोरावर स्मिथला क्लीनबोल्ड केले. पुढे बेन स्टोक्स(१७) जॉन्सने बाद केले. धोनी देखील यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आहे. धोनीला(७) बुमराहने क्लीनबोल्ड केले. मनोज तिवारीने अखेरच्या षटकात फटकेबाजी केली खरी पण तोही बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. अखेर पुण्याला १६० धावांवरच समाधान मानावे लागले. मुंबईकडून कर्ण शर्मा, बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर जॉन्सन आणि हरभजन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सामनावीर- बेन स्टोक्स

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-04-2017 at 19:27 IST

संबंधित बातम्या