लिव्हरपूल : लिव्हरपूलने बुधवारी बेन्फिकाविरुद्ध झालेली उपांत्यपूर्व फेरीतील दुसरी लढत ३-३ अशी बरोबरीत सोडवली असली तरीही ६-४ अशा एकूण गोलफरकाआधारे त्यांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉलची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांचा सामना व्हिलारेयालशी होणार आहे.

लिव्हरपूलने उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत ३-१ असा विजय मिळवला होता. त्या लढतीत एक गोल करणाऱ्या इब्राहिम कोनाटेने बुधवारी झालेल्या लढतीतही २१व्या मिनिटाला गोल केला. त्याशिवाय रोबेटरे फिरमिनोने सामन्याच्या उत्तरार्धात ५५व्या आणि ६५व्या मिनिटाला दोन गोल केले. बेन्फिकाला गोंकालो रामोसने ३२व्या मिनिटाला गोल करत १-१ असे बरोबरीत आणले. मात्र, लिव्हरपूलने दोन गोल करत ३-१ अशी आघाडी घेतली. बेन्फिकाकडून बदली खेळाडू म्हणून आलेल्या रोमान यारेमचुक (७३ वे मि.) आणि डार्विन नुनेज (८२ वे मि.) यांनी गोल मारत सामना ३-३ असा बरोबरीत आणला.

मँचेस्टर सिटीची आगेकूच

मँचेस्टर सिटी आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतरही मँचेस्टर सिटीने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मँचेस्टर सिटीचा उपांत्य फेरीत रेयाल माद्रिदशी सामना होणार आहे. मँचेस्टर सिटीने उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत १-० असा विजय मिळवला होता. मँचेस्टर सिटीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, अ‍ॅटलेटिको माद्रिदने त्यांना गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही. पूर्वार्धात अ‍ॅटलेटिकोच्या आघाडीच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. उत्तरार्धात ग्रिझमनला ५७व्या मिनिटाला गोल करण्याची संधी चालून आली, पण त्याला यश मिळाले नाही.