‘बदलता महाराष्ट्र’मध्ये क्रीडासंस्कृतीचा जागर!

ऑगस्टमध्ये रिओमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे.

 

‘क्रीडासंस्कृती : काल, आज आणि उद्या’वर गुरुवार-शुक्रवारी मान्यवरांची परिषद

जागतिकीकरणाच्या पर्वानंतर सर्वच खेळांचे परिमाण बदलले. मनोरंजन आणि करमणूक यांच्या पल्याड खेळांचा परीघ विस्तारला. खेळभावना, थरार, जल्लोष यांच्याइतकेच कोटीच्या कोटी उड्डाणरूपी करार, उत्तेजके, परस्परविरोधी हितसंबंध आणि हिंसाचारी चाहते अशी खेळांची ओळख झाली आहे. या बदलत्या संक्रमणाचा वेध ‘लोकसत्ता-बदलता महाराष्ट्र’मध्ये घेतला जाणार आहे. हा परिसंवाद मुंबईत येत्या ३० जून आणि १ जुलै रोजी रंगणार आहे. ऑगस्टमध्ये रिओमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या क्रीडा कुंभमेळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या टीजेएसबी बँक प्रस्तुत परिषदेचा विषय आहे- ‘क्रीडासंस्कृती : काल, आज आणि उद्या’. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. हे या परिषदेचे सहप्रायोजक असून, कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले आहे.

गुरुवार, ३० जून रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्रातील देशी खेळ’ या पहिल्या सत्रात खो-खो संघटक अरुण देशमुख, माजी महिला कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर आणि कुस्ती संघटक बाळासाहेब  लांडगे हे मान्यवर भूमिका मांडतील. दुसऱ्या सत्रामध्ये टेनिस संघटक सुंदर अय्यर, बॉक्सिंग संघटक जय कवळी आणि कबड्डीतज्ज्ञ राजू भावसार हे मान्यवर ‘व्यावसायिकतेची बदलती लीग’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. या दिवसातील तिसरे सत्र ‘महिलांना दुजाभाव’ हे असून, यात माजी नेमबाजपटू सुमा शिरूर, भारताची माजी महान महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी आणि मल्लखांब प्रशिक्षक नीता ताकटे या मान्यवरांचा सहभाग असेल.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये ‘खेळाची नशा आणि नशेचा खेळ’ या विषयावर तंदुरुस्तीतज्ज्ञ शैलेश परुळेकर, वेटलिफ्टिंग संघटक संजय सरदेसाई आणि क्रीडा वैद्यक तज्ज्ञ डॉ. निखिल लाटय़े हे मान्यवर आपली मते मांडतील. या दिवसातील दुसऱ्या सत्राचा विषय ‘खेळ, व्यवस्थापन आणि करिअर’ असा असून, या विषयावर माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी, माजी कॅरमपटू आणि संघटक अरुण केदार आणि ज्येष्ठ पत्रकार वि.वि. करमरकर मार्गदर्शन करतील. परिषदेचे तिसरे सत्र ‘खेळ, संस्कार आणि संस्कृती’ या विषयावर असून, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा कुस्तीपटू नरसिंग यादवचे बंधू विनोद कुमार यादव, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि बुद्धिबळतज्ज्ञ प्रवीण ठिपसे हे मान्यवर विचार मांडतील. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असली, तरी त्यातील चर्चेचा वृत्तान्त ‘लोकसत्ता’तून राज्यातील क्रीडाप्रेमी वाचकांसमोर सादर केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta badalta maharashtra on sport