Virat Kohli On Gary Sobers: वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सर गारफिल्ड (गॅरी) सोबर्स यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गॅरी सोबर्स यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने देखील एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
विराट कोहलीने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “क्रिकेट जगताने आपल्या सर्वात महान खेळाडूंपैकी एकाला गमावले आहे. सर गारफील्ड सोबर्स, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमचा महान वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांना नेहमीच प्रेरित करत राहील.” ज्यावेळी भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी गॅरी सोबर्स यांनी विराट कोहलीची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी विराट कोहलीचं कौतुकही केलं होतं.
गॅरी सोबर्स यांचा जन्म १९३६ मध्ये बारबाडोसमध्ये झाला. त्यांना १९५४ ते १९७४ या कालावधीत वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांना ९३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान फलंदाजी करताना त्यांनी ५७.७८ च्या सरासरीने ८०३२ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी २६ शतकं आणि ३० अर्धशतकं झळकावली.
गॅरी सोबर्स हे केवळ उत्तम फलंदाज नव्हते, तर ते आपल्या गोलंदाजीसाठीही ओळखले जायचे. गॅरी सोबर्स हे डाव्या हाताने गोलंदाजी करायचे. मुख्य बाब म्हणजे, ते वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीही करायचे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी २३५ गडी बाद केले होते. त्यांच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. त्यापैकी एक रेकॉर्ड म्हणजे, गॅरी सोबर्स हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना एकाच षटकात लागोपाठ ६ षटकार खेचणारे ते पहिलेच फलंदाज ठरले होते. १९६८ मध्ये नॉटिंघमशरकडून खेळताना त्यांनी ग्लेमोर्गनविरुद्ध हा ऐतिहासिक पराक्रम केला होता.
