प्रो कबड्डी लीगमुळे हा खेळ एनबीएप्रमाणेच रुजतोय!

आठवडय़ाची मुलाखत : रिकाडरे एक्युना, अर्जेटिनाचे प्रशिक्षक

आठवडय़ाची मुलाखत : रिकाडरे एक्युना, अर्जेटिनाचे प्रशिक्षक

आयताकृती मैदानावर खरी कबड्डी खेळली जाते, वर्तुळाकार कबड्डी म्हणजे शक्तीचाच खेळ असतो. आयताकृती कबड्डीत फक्त सामथ्र्य महत्त्वाचे नसते, तर तंत्र, कौशल्य, रणनीती आणि बुद्धीच्या बळाचा कस लागतो. प्रो कबड्डी लीगमुळे हा खेळ एनबीएप्रमाणेच रुजतो आहे, असे मत अर्जेटिनाचे प्रशिक्षक रिकाडरे एक्युना यांनी व्यक्त केले.

ब्यूनस आयर्सपासून दोन हजार किलोमीटर अंतरावरील पटागोनिया या गावी रिकाडरे यांचे निवासस्थान आहे. बऱ्याचदा बर्फवृष्टी होत असलेल्या या भागात समुद्रकिनारी कबड्डीप्रमाणेच बर्फाच्छादित मैदानावर ‘आइस कबड्डी’चे सामनेसुद्धा आता रंगतात. पेशाने शारीरिक शिक्षण शिक्षक असलेले रिकाडरे गेली १७ वष्रे कबड्डीचा प्रचार-प्रसार करीत आहेत. आता लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, उरुग्वे, कोलंबिया, चिली, मेक्सिको आणि पेराग्वे या सहा देशांमध्ये पुढील दोन वर्षांत एक स्पर्धा घेण्याचा त्यांचा बेत आहे. विश्वचषकात भारत, बांगलादेश आणि कोरियाविरुद्धचे सामने आमच्यासाठी आव्हानात्मक असतील, परंतु ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये आम्ही उत्तम कामगिरी दाखवू अशी आशा आहे, असे त्यांनी सांगितले. अर्जेटिनातील वातावरण, विश्वचषकामधील आव्हान या संदर्भात रिकाडरे यांच्याशी केलेली बातचीत-

  • कबड्डी या खेळाकडे तुम्ही कसे वळलात?

रग्बी आणि बॅडमिंटन हे खेळ मी आवडीने खेळायचो. १९९९ मध्ये मी कॅनडाला गेलो असताना कबड्डी खेळायची संधी मिळाली. तेव्हापासून या खेळाचा मी देशात प्रचार करतो आहे. नंतर अर्जेटिनातील कबड्डीची छायाचित्रे मी आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाला पाठवली. या पाश्र्वभूमीवर २००४च्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेला येण्याचे निमंत्रण मला मिळाले.

  • अर्जेटिना हे जगात फुटबॉलप्रेमी राष्ट्र म्हणून ओळखले जाते. तुमच्या देशात कबड्डीचे वातावरण कसे आहे?

काही शाळा-महाविद्यालयांमध्ये कबड्डी हा बिगरखर्चीक खेळ खेळवला जातो. त्यामुळे दोन आठवडय़ांआधीपर्यंत हा खेळ अर्जेटिनामधील फक्त शारीरिक शिक्षण शिक्षकांना ज्ञात होता; पण कबड्डी विश्वचषकामुळे तो आता सर्वाना ठाऊक झाला आहे. आमच्या देशातील माणसे फुटबॉल खेळतात, नव्हे जगतात. त्यामुळे चेंडू नसलेला हा खेळ आहे, हे सत्य स्वीकारणे त्यांना जड गेले.

  • विश्वचषक कबड्डी स्पध्रेबाबत अर्जेटिनामधील नागरिकांना माहिती आहे का?

काही दिवसांपूर्वी विश्वचषक कबड्डी स्पध्रेत अर्जेटिना खेळणार आहे, या आशयाचे अभियान समाजमाध्यमावर ‘फेसबुक’वर चालवण्यात आले. या अभियानाला अल्पावधीत उदंड प्रतिसाद मिळाला. या खेळाची आणि देशाच्या कामगिरीची सर्वानाच उत्सुकता निर्माण झाली. आता आणखी एक आनंदाची गोष्ट आमच्या बाबतीत घडली आहे, ती म्हणजे अर्जेटिनाचे पाचही साखळी सामने देशात एका संकेतस्थळावर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. फुटबॉल, सॉकर, हॉकी, गोल्फ असे काही खेळ आमच्या देशात लोकप्रिय आहेत. मात्र कबड्डी या खेळाला आणि विश्वचषक सामन्यांविषयी आमच्या संघाला चांगले पाठबळ मिळू लागले आहे. शुभेच्छांच्या वर्षांवामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही.

  • अर्जेटिनाच्या संघाच्या तयारीविषयी काय सांगाल?

विश्वचषकामधील सर्व संघांमध्ये खेळाडू किंवा प्रशिक्षक यामध्ये भारताचा संबंध आढळतो. मात्र अर्जेटिनाचा संघ हा मार्गदर्शक ते खेळाडू संपूर्णत: देशी आहे. रग्बी, कुस्ती, मार्शल आर्ट्स, ज्युदो आदी खेळांचा अनुभव असलेले खेळाडू संघात आहेत. भारत दौऱ्यावर आल्यानंतर अनुभवी कबड्डीपटू बी. सी. रमेश यांचे मार्गदर्शन आमच्या खेळाडूंना मिळाले. त्यामुळे खेळाडूंच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये कमालीची भर पडली आहे. याशिवाय भारतात येण्यापूर्वी प्रो कबड्डी लीगच्या चार हंगामांची चित्रणे बारकाईने आम्ही पाहिली आहेत. जयपूर पिंक पँथर्स हा आमचा सर्वात आवडता संघ आहे. याशिवाय तेलुगू टायटन्स, पाटणा पायरेट्स हे संघसुद्धा आवडतात. मार्च महिन्यात मला आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाकडून विश्वचषकात अर्जेटिना खेळेल का, अशी विचारणा केली. त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

  • अर्जेटिनातून तुम्ही कबड्डीची गुणवत्ता कशी शोधली?

मी शारीरिक शिक्षक असून पर्यायी खेळांवर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कार्यरत आहे. मी गेली पाच वष्रे शारीरिक शिक्षण शिक्षकांना कबड्डीचे धडे देत आहे. ते आपापल्या शाळा-महाविद्यालयांत या खेळाचा प्रचार करीत आहेत. यातून उत्तम गुणवत्ता हेरता आली. राष्ट्रीय कबड्डी संघटनेला सहा संघ आणि १५० खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यात ८० महिला आणि ७० पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. सध्या हिरवळीवर कबड्डी खेळली जाते, मात्र विश्वचषकानंतर मॅटवर खेळण्यास प्रारंभ करणार आहोत.

  • कोणता भारतीय खेळाडू तुम्हाला आवडतो?

माझ्यासहित अर्जेटिनाच्या बऱ्याच खेळाडूंना भारताचा संघनायक अनुपकुमारचा खेळ अतिशय आवडतो. याशिवाय राहुल चौधरीच्या खेळाचेसुद्धा संघात चाहते आहेत.

  • तुमच्या जर्सीवर असलेल्या बोधचिन्हात साप आहे?

होय, अर्जेटिनामध्ये फुटबॉल वगळता सर्व खेळांना विशिष्ट प्राण्याचे बोधचिन्ह दिले आहे. आमच्या जर्सीवरील बोधचिन्हात जलारास जरारा या विषारी सापाचा वापर करण्यात आला आहे. हा साप डंख मारतो आणि पटकन पळतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta sport interview with ricardo acuna