बिम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरलं होतं. नोवाक, अँडी मुरे यांचे सामने होणार असल्याने प्रेक्षकही उत्सुक होते. दरम्यान सामना सुरु होण्यायआधी मैदानात टाळ्यांचा जोरात कडकडाट पहायला मिळाला. पण या टाळ्या कोणत्याही खेळाडूसाठी नाही तर मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या वैज्ञानिकांसाठी होत्या.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाची करोना लस तयार करणाऱ्या प्राध्यापक सारा गिल्बर्ट तसंच राष्ट्रीय आरोग्य सेवेचे कर्मचारी (एनएचएस) विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. यावेळी करोना संकटात मोठं योगदान देणारे तसंच ज्यांच्यामुळे ही स्पर्धा शक्य होत आहे त्यांना प्रतिष्ठित रॉयल बॉक्समधून सामना पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

उद्घोषकाने करोना लस निर्मिती करणारे उपस्थित असल्याची घोषणा करताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. टाळ्यांचा हा आवाज प्रत्येक क्षणाला वाढत होता.

विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

प्रेक्षकांनी उभं राहून वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी रॉयल बॉक्समध्ये बसलेल्या प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांच्या चेहऱ्यावरही हास्य आणि समाधान दिसत होतं.