नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत वजन गट वाढवून खेळणारी भारताची आघाडीची खेळाडू लवलिना बोरगोहेनची तीन कांस्यपदके पुरी झाली, आता लक्ष्य फक्त सुवर्णपदकाचे अशी दुर्दम्य इच्छाशक्ती व्यक्त केली.
याच महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत लवलिना ७५ किलो वजन गटातून खेळणार आहे. यापूर्वी, लवलिनाने ६९ किलो वजन गटातून खेळताना जागतिक स्पर्धेत दोन आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा अशी तीन कांस्यपदके मिळवली आहेत. आता भारतातच १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत लवलिनाने वजन गट वाढवण्याचा निर्णय घेतला. या वेळी ती प्रथमच ७५ किलो गटातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे. हा बदल निश्चितच माझ्या पदकाचा रंग बदलण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे लवलिनाने सांगितले.
या स्पर्धेत लवलिनाबरोबरच निकहत झरीनच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा लागून असतील. निकहत मायदेशात आपले सुवर्णपदक टिकवण्याचा प्रयत्न करेल. लवलिना २०१८ आणि २०१९ स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिली होती. ती म्हणाली, ‘‘मी नेहमीच शंभर टक्के योगदान देण्याचा विचार करून रिंगमध्ये उतरते. सुवर्णपदक मिळवू न शकल्याची खंत मलादेखील आहे. तयारी चांगली झाली आहे. या वेळी मी पदकाचा रंग बदलण्यासाठी कमालीची उत्सुक आहे.’’