Lovlina Borgohain Asian Games 2026 Boxing Gold Medal Match: भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत लव्हलिनाने इतिहास घडवला आहे. निशिओ जिम्नॅशियममध्ये झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात लव्हलिनाने चीनच्या झियी बाओचा पराभव केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील कारकिर्दीतील पहिलं सुवर्णपदक पटकावलं. लव्हलिनाने अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडूवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. याशिवाय लव्हलिनाने तिच्या वाढदिवशी हे खास सुवर्णपदक पटकावलं आहे.
याआधी लव्हलिनाने कझाकिस्तानच्या नताल्या बोगदानोव्हा हिचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. २०२२च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र, यावेळी लव्हलिनाने पदकाचा रंग बदलत थेट सुवर्णपदकावर नाव कोरलं. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी लव्हलिना भारताची केवळ दुसरी महिला बॉक्सर ठरली आहे. तिच्याआधी हा पराक्रम दिग्गज मेरी कोम यांनी केला होता.
महिलांच्या ७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोरगोहेनचा सामना चीनच्या बाओ झियीशी झाला. पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सर अधिक आक्रमक वाटत असली, तरी लव्हलिनाने संयम राखत महत्त्वाच्या क्षणांवर गुण मिळवले आणि अखेरीस पहिली फेरी ३-२ अशा फरकाने जिंकली. दुसऱ्या फेरीत चुरशीची लढत पाहायला मिळाली, परंतु लव्हलिनाने ती फेरी ४-१ अशी जिंकत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली आणि सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. पहिल्या दोन फेऱ्या जिंकून २-० अशी आघाडी घेतल्यानंतर, लव्हलिना बोरगोहेनने तिसऱ्या फेरीतही आपला दबदबा कायम राखला आणि ५-० अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला.
२८ वर्षीय लव्हलिनाच्या नावावर याआधीच ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकं आहेत. आता नागोयातील या सुवर्णपदकामुळे तिच्या शानदार कारकिर्दीत आणखी एका मोठ्या कामगिरीची भर पडली आहे. लव्हलिनाच्या या सुवर्णपदकामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १२ वर पोहोचली आहे. स्पर्धेच्या १४व्या दिवशीही भारतीय खेळाडूंची पदकांची दमदार कामगिरी सुरूच आहे.
