Lovlina Borgohain Indian boxer creates history at Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत १० सुवर्णपदकांचा आकडा गाठला आहे. सुवर्णपदकांच्या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोरगोहेनने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह तिने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. लव्हलिना बोरगोहेन ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये २ वेळा फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
बुधवारी झालेल्या महिलांच्या ७५ किलोग्रॅम वजनी गटातील सेमीफायनलमध्ये दमदार पुनरागमन करून कझाकस्तानच्या नतालिया बोगदानोव्हाचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. यासह दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या बोगदानोव्हावर तिने ३-२ ने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे ती आणखी एकदा पदकाच्या अगदी जवळ पोहोचली आहे .
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मुक्केबाजांकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. पुरुषांच्या ८० किलोग्रॅम वजनी गटात अंकुश पांघल आणि महिलांच्या ६५ किलोग्रॅम वजनी गटात परवीन हुड्डा यांनी सुवर्णपदक पटकावण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या यादीत आता लव्हलिना बोरगोहेनचंही नाव जोडलं गेलं आहे. ती या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारी तिसरी मुक्केबाज ठरली आहे.
सेमीफायनलमध्ये दमदार विजय
सेमीफायनलच्या सामन्यात लव्हलिना बोरगोहेनला हवी तशी सुरूवात करता आली नाही. पहिल्या फेरीत दोघींनीही सावध सुरूवात केली. दोघींनीही सुरूवातीला हल्ला चढवणं टाळलं. दोघींपैकी एकाही मुक्केबाजाने आघाडी न घेतल्याने शेवटी पंचांना निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय लव्हलिना बोरगोहेनच्या विरोधात लागला. पहिल्या राऊंडमध्ये तिला २-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढील फेरीत तिने चुका करणं टाळलं. दुसऱ्या फेरीत तिने दमदार पुनरागमन केलं. या फेरीत तिने अधिक आक्रमक होऊन खेळ केला. लव्हलिना बोरगोहेनने या फेरीत ३-२ ने विजय मिळवला. आता फायनलमध्ये तिच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असून, तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असणार आहे.
