LSG Announces Replacement player for IPL 2026: केकेआरविरूद्धच्या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा संघ चर्चेत आहे. मुकुल चौधरीने अखेरच्या षटकांमध्ये कठीण वाटणारा विजय संघाला मिळवून दिला. आयपीएल २०२६ ची सुरुवात लखनौसाठई पराभवाने झाली होती. मात्र, त्यानंतर संघाने सलग दोन सामने जिंकून जोरदार पुनरागमन केलं. दरम्यान, लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक स्टार गोलंदाज संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी, एक दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू, जो अद्याप आयपीएलमध्ये खेळलेला नाही, त्याचा संघात समावेश केला आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाचा स्टार ​​फिरकी अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला असून तो संघात सामील होऊ शकणार नाही. एलएसजीचे क्रिकेट संचालक, टॉम मूडी यांनी गुरुवारी (९ एप्रिल, २०२६) ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यादरम्यान ही घोषणा केली. मूडी यांनी सांगितलं की, हसरंगा संघात सामील होऊ शकणार नाही आणि त्याच्या जागी नवीन खेळाडू शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी सांगितलं की, पुढील २४ ते ४८ तासांत बदली खेळाडूची घोषणा केली जाईल.

लखनौ फ्रँचायझीने बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज जॉर्ज लिंडेची निवड केली गेली. संघाने अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आणि इंग्लंडचा लियाम डॉसन यांसारख्या इतर विदेशी फिरकी गोलंदाजांचाही विचार केला होता, पण अखेरीस ३४ वर्षीय दक्षिण आफ्रिकन फिरकी गोलंदाज जॉर्ज लिंडेची निवड केली. जॉर्ज लिंडे हा टी-२० फॉरमॅटमधील एक अत्यंत अनुभवी गोलंदाज आहे. त्याने २५० टी-२० सामन्यांमध्ये केवळ ७.४२ च्या इकॉनॉमी रेटने २१८ बळी घेतले आहेत. तो डावखुरा फिरकी गोलंदाज असून फलंदाजीही करू शकतो.

वनिंदू हसरंगाची गणना सध्याच्या सर्वात यशस्वी टी-२० गोलंदाजांमध्ये केली जाते. पण, लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्याची उणीव भासणार नाही. संघात मणिकरण सिद्धार्थ आणि दिग्वेश सिंग राठी यांच्यासारखे देशांतर्गत फिरकी गोलंदाज आधीच आहेत. जॉर्ज लिंडेच्या आगमनाने संघ आणखी मजबूत होईल.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार अर्धशतकं झळकावलेला लिंडे, खालच्या फळीत फलंदाजी करूनही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉर्ज लिंडेने तीन कसोटी, चार एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.