LSG beat RCB by 9 Runs IPL 2026: लखनौचं अखेर नशीब फळफळलं आणि संघाने आरसीबीचा पराभव करत एका महिन्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये सामना जिंकला आहे. ऋषभ पंतने गेल्या सामन्यातील पराभवानंतर सामना जिंकण्यासाठी नशीबाची गरज असते, असं म्हटलं होतं. त्यानुसार लखनौच्या बाजूने आज नशीब असल्याने संघाने कमालीच्या सांघिक कामगिरीसह सामना जिंकला. आरसीबीचा अखेरच्या षटकात लखनौने ९ धावांनी पराभव केला, या पराभवासह आरसीबीची टेबल टॉपर होत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्याची संधी हुकली आहे.

अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना दिग्वेश राठीने कमालीचं अखेर षटक टाकलं. पहिल्या चेंडूवर लेग बायमुळे १ धाव मिळाली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर कृणाल पंड्याने एक धाव घेतली. दिग्वेशने तिसरा चेंडू गुगली टाकला आणि शेफर्ड चेंडू खेळायला चुकला व डॉट राहिला. यानंतर चौथा चेंडू वाईड पडला, त्यानंतर ऋषभ पंतने त्याच्याशी चर्चा केली. चौथ्या लीगल चेंडूवर शेफर्डने चौकार मारला. तर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी शेफर्डने चेंडू उचलला, पण चेंडू बॅटवर नीट न आल्याने सीमारेषेच्या आत चेंडू पडला आणि अखेरच्या चेंडूवर १ धाव घेतल्याने आरसीबीने ९ धावांनी सामना गमावला.

डीएलएल पद्धतीनुसार लखनौने २०९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर आरसीबीला विजयासाठी २१३ धावांचं आव्हान देण्यात आलं. आरसीबीची सुरूवात मात्र खराब झाली आणि सुरूवातीच्या २ षटकांत जेकब बेथल व विराट कोहली बाद होत माघारी परतले. यानंतर देवदत्त पडिक्कल व रजत पाटीदार यांनी ९५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. देवदत्त पडिक्कल ३४ धावा करत बाद झाला. तर जितेश शर्मा एका धावेवर माघारी परतला. प्रिन्स यादवने विराट कोहलीनंतर ११व्या षटकात जितेश व पडिक्कलच्या मोठ्या विकेट्स घेतल्या.

तर कर्णधार रजत पाटीदारने ३१ चेंडूत ३ चौकार व ६ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. यानंतर टीम डेव्हिडने आपलं रौद्र रूप दाखवलं. टीम डेव्हिडने १७ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांची खेळी करत बाद झाला. यानंतर कृणाल पंड्या व रोमारियो शेफर्डने संघाचा डाव सावरला. पण अखेरच्या षटकात दोघे संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. लखनौकडून प्रिन्स यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. शाहबाज अहमदने २ तर मोहम्मद शमीने १ विकेट्स घेतल्या.

आरसीबीने नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पावसामुळे सामन्यात तीन वेळा व्यत्यय आल्याने सामना थांबवण्यात आला होता. पण लखनौच्या फलंदाजीवर याचा काहीच परिणाम झाला नाही, मिचेल मार्शने एका टोकाकडून संघाचा डाव सावरून धरत शतक झळकावलं. मिचेल मार्शने ५६ चेंडूत ९ चौकार व ९ षटकारांसह १११ धावांची वादळी खेळी केली. तर अर्शीन कुलकर्णीने १७ धावांचं योगदान दिलं. याशिवाय निकोलस पुरनने २३ चेंडूत ३८ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने शानदार खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येत फिनिशरची भूमिका निभावली.

ऋषभ पंतने १९ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा केल्या. आरसीबीकडून जोश हेझलवूड, कृणाल पंड्या व रसिख सलाम दार यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.