Fight In IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघातील फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. लखनौचा संपूर्ण डाव अवघ्या १४१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून समीर रिझवीने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि दिल्लीला पहिला विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीची जोडी मैदानावर होती. त्यावेळी लखनौकडून पाचवे षटक टाकण्यासाठी प्रिन्स यादव गोलंदाजीसाठी आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने दमदार पूल शॉट मारला. चेंडू वेगाने स्क्वेअर लेगच्या दिशेने चार धावांसाठी गेला. हा शॉट पाहून प्रिन्स यादव संतप्त झाला होता.
पुढचा चेंडू त्याने लेंथवर टाकला. हा चेंडू ट्रिस्टन स्टब्सने डिफेंड केला. चेंडू टाकतात तो पुढे गेला त्याने ट्रिस्टन स्टब्सच्या डोळ्यात डोळे घालून रागाने पाहिलं. ट्रिस्टन स्टब्सनेही त्याला तोडीस तोड उत्तर दिलं आणि खुन्नस देऊन पाहिलं. दोघांमध्ये बाचाबाची होणार होती, पण दोघेही माघारी परतले. त्यामुळे वाद वाढला नाही.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा डाव अवघ्या १४१ धावांवर आटोपला. लखनौकडून अब्दुल समदने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. केएल राहुल गोल्डन डकवर माघारी परतला.
त्यानंतर पथुम निसांका देखील १ धाव करून माघारी परतला. नितीश राणाने १५ धावांची खेळी केली. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या समीर रिझवीने नाबाद ७० धावांची खेळी केली. अक्षर पटेल शून्यावर माघारी परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ३९ धावांची खेळी करून दिल्लीला हा सामना जिंकून दिला.
