Justin Langer On Rohit Sharma: वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबईचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा हिट शो पाहायला मिळाला. स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे विजय मिळवणं हाच एक पर्याय होता. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांअखेर २२८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने ६ गडी राखून विजय मिळवला. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८४, तर रायन रिकल्टनने ८३ धावांची खेळी केली. या खेळीनंतर लखनौ सुपर जायंट्स संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी रोहित शर्माच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. गेल्या काही सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता. पण लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात तो फिट होऊन संघात परतला. जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती, त्यावेळी त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. रोहित- रिकल्टन या जोडीने मिळून पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. रोहितने ८४ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ८३ धावांची खेळी केली.
जस्टीन लँगरकडून रोहित शर्माचं कौतुक
मुंबईच्या विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जस्टीन लँगर यांनी रोहित शर्माच्या खेळीचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “काय खेळाडू आहे हा.. जबरदस्त! जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाकडून प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून खेळायचो तेव्हा तो किती महान आहे हे आधीपासून मला माहीत होतं. आता लखनौ सुपर जायंट्सचा प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना देखील मला याची जाणीव आहे. हेच आयपीएल स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. दररोज रात्री, टीव्हीवर किंवा मैदानावर, आपल्याला जगातील सर्वोत्तम टॅलेंटेड खेळाडूंना खेळताना पाहायची संधी मिळते.”
मुंबईचा दमदार विजय
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना लखनौने २२८ धावांचा डोंगर उभारला. लखनौकडून निकोलस पूरनने दमदार अर्धशतकी खेळी केली. २२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने ८४ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ८३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने लखनौवर ६ गडी राखून दमदार विजय मिळवला.
