Lucknow Super giants vs Delhi Capitals: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पाचवा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लखनौतील एकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभवाने सुरूवात करावी लागली आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाचा डाव अवघ्या १४१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून समीर रिझवी चमकला. दमदार अर्धशतकी खेळी करून त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १४२ धावा करायच्या होत्या. पण या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. दिल्लीकडून केएल राहुल आणि पथुम निसंकाची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. पण केएल राहुल मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर पथुम निसंका देखील एका धावेवर माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीश राणाने २ चौकार आणि १ षटकार मारला. पण तो १५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार अक्षर पटेल देखील शून्यावर माघारी परतला.

समीर रिझवीने सावरला डाव

समीर रिझवी या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला होता. त्याचा फलंदाजीत चांगलाच इम्पॅक्ट पाहायला मिळाला. त्याने ३७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह ट्रिस्टन स्टब्ससोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. स्टब्सने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. तर समीर रिझवीने ७० धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

लखनौ सुपर जायंट्स संघाचा पहिला डाव

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकला आणि लखनौ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लखनौकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने ३५ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. पण त्यानंतर विकेट्सची रांग लागली. ऋषभ पंत ७, एडन मारक्रम ११, आयुष बदोनी ०, निकोलस पूरन ८ धावा करून माघारी परतला. तर अब्दुल समदने ३६ तर शाहबाज अहमदने १५ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १४० पार पोहोचवली. पण १४१ धावांवर संघाचा संपूर्ण डाव आटोपला. दिल्लीकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने २ अक्षर पटेलने १ गडी बाद केला.