राष्ट्रीय संघ किंवा आयपीएलसारख्या भव्य मंचावर पोहोचण्यासाठी फक्त प्रतिभा पुरेशी नसते, तर योग्य संधी आणि व्यासपीठही तितकंच महत्त्वाचं असतं. हीच गरज ओळखून विविध राज्यांमध्ये स्थानिक क्रिकेट लीग्सना सुरुवात झाली. राज्यातील होतकरू क्रिकेटपटूंना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी देणारी ही स्पर्धा आता देशांतर्गत क्रिकेटच्या नकाशावर नव्याने सुरूवात झाली आहे. मध्य प्रदेश प्रीमियर लीगची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मध्य प्रदेश प्रीमियर लीग स्पर्धेला कधीपासून सुरूवात झाली?

मध्य प्रदेश प्रीमियर लीग (Madhya Pradesh Premier League – MPL) ही मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (MPCA) सुरू करण्यात आलेली राज्यस्तरीय फ्रँचायझी-आधारित टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. या लीगची सुरुवात २०२४ साली झाली असून, मध्य प्रदेशामधील होतकरू क्रिकेटपटूंना मोठा मंच मिळावा, हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे तसेच नवोदित खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून, आयपीएल स्काऊट्ससाठी ही लीग एक महत्त्वाचा टॅलेंट पूल ठरत आहे.

MPL मध्ये विविध शहरांचे प्रतिनिधित्व करणारे ७ संघ आहेत आणि बहुतांश सामने ग्वालियरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवले जातात. या लीगमधून अभिषेक पाठक, पृथ्वीराज सिंह तोमर, मंगेश यादव यांसारखे खेळाडू गाजले असून, त्यांच्या कामगिरीकडे देशभरातील निवड समिती आणि फ्रँचायझींचे लक्ष वेधलं गेलं आहे.

मध्य प्रदेश प्रीमियर लीगमधील सर्व ६ संघ

१. भोपाल लेपर्ड्स
२. बुंदेलखंड बुल्स
३. चंबल घरियाल्स
४. ग्वालियर चितास
५. इंदोर पिंक पँथर्स
६. जबलपूर रॉयल लायन्स
७. रेवा जॅग्वार्स

मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये गाजलेले खेळाडू

२०२४ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील काही गाजलेले खेळाडू गेल्यावर्षी आणि आगामी आयपीएलमध्ये झळकताना दिसणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील विस्फोटक फलंदाज अनिकेत वर्मा हा मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये गाजलेला खेळाडू आहे, ज्याने १२३ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर २०२५ आयपीएलमध्ये संघात संधी मिळवत चमकदार कामगिरी केली. त्याशिवाय माधव तिवारी व शिवम शुक्ला हे देखील २०२५ मध्ये आयपीएल संघाचा भाग होते. तर महत्त्वाची नावं म्हणजे मुंबई इंडियन्सकडून खेळलेला अर्शद खान, रजत पाटीदार, कुलदीप सेन, कुमार कार्तिकेय, कुलवंत खेजरोलिया हे आयपीएलचा अनुभव असलेले खेळाडू एमपीएलमध्येही खेळताना दिसतात.

मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज मंगेश यादव येत्या आयपीएल हंगामात खेळताना दिसणार आहे. मंगेश यादवला आयपीएल २०२६ साठीच्या लिलावात मोठी बोली लागली. त्याला ५.२ कोटींना आरसीबी संघाने आपल्या ताफ्यात दाखल केलं.