शंभर टक्के योगदान दिल्याशिवाय यशाची पायरी चढता येत नाही, हा सेबॅस्टियन वेटेलच्या यशाचा मूलमंत्र. चालता-बोलता, उठता-बसता आणि झोपतानाही फक्त फॉम्र्युला-वनचा विचार करणाऱ्या वेटेलने जणू यशालाच प्रदक्षिणा घातली, असाच भास होत आहे. वेटेलच्या वेगवान थराराचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना वेटेलने नाराज केले नाही. पात्रता शर्यतीत वेटेलची ‘जादुगिरी’ पाहायला मिळाली. अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान पटकावून वेटेलने आपल्या चाहत्यांची मने जिंकली.
गेल्या पाच शर्यती जिंकणाऱ्या वेटेलने भारतातील सर्व शर्यतींमध्ये अद्याप कुणालाही वरचढ होऊ दिले नाही. भारतातील सराव शर्यतींबरोबर पात्रता आणि मुख्य शर्यतींवरही वेटेलचा बोलबाला राहिला आहे. १ मिनिट २४.११९ सेकंद अशा वेळेसह सर्वात वेगवान फेरी (लॅप) मारणारा वेटेल आता रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीत पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करेल. वेटेलची ही सलग सहावी पोल पोझिशन ठरली. मर्सिडिझच्या निको रोसबर्ग आणि लुइस हॅमिल्टन यांनी वेटेलला कडवी लढत देण्याचा प्रयत्न पडला. पण वेटेलशाहीच्या वर्चस्वापुढे दोघांचेही प्रयत्न तोकडे पडले. अखेर रोसबर्ग दुसरा तर हॅमिल्टन तिसरा आला. विश्वविजेतेपदाच्या मुकुटासाठी वेटेलला टक्कर देणारा फेरारीचा फर्नाडो अलोन्सो आठव्या क्रमांकावर फेकला गेल्यामुळे त्याला आता जादुई कामगिरीच करावी लागेल. सहारा फोर्स इंडियाने मात्र भारतीय चाहत्यांची निराशा केली. पॉल डी रेस्टा आणि एड्रियन सुटील हे पहिल्या १० जणांमध्येही स्थान मिळवू शकले नाहीत.