मुंबई : पूर्वी मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध खेळायचे या विचारानेच प्रतिस्पर्ध्याच्या मनात भीती असायची. आता चित्र बदलले आहे. कार्लसन अजूनही विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू असला, तरी पारंपरिक (क्लासिकल) बुद्धिबळ खेळण्यासाठी आवश्यक संयम त्याच्यात दिसून येत नाही. बहुधा हीच बाब प्रतिस्पर्ध्यांच्या पथ्यावर पडते, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

सध्या सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनने अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला आठपैकी चार डावांत हार पत्करावी लागली असून भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने त्याला दोन वेळा पराभूत करण्याची किमया साधली आहे. गतवर्षी पारंपरिक बुद्धिबळात संघर्ष करणार्‍या प्रज्ञानंदने नॉर्वे स्पर्धेत कार्लसनविरुद्ध केलेला खेळ वाखाणण्याजोगा ठरला. त्याची गेल्या काही फेर्‍यांतील कामगिरी भविष्याच्या दृष्टीने आशादायी चित्र निर्माण करत असल्याचेही ठिपसे म्हणाले.

प्रज्ञानंदची बहीण आर. वैशाली आगामी काळात महिला जगज्जेतेपदाची लढत खेळणार आहे. त्यामुळे तिला मदत करण्यावर प्रज्ञानंद लक्ष केंद्रित करेल आणि यामुळे त्याची कारकीर्द मागे पडेल, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, बहिणीला साथ देताना त्याचा स्वत:चा खेळही पुन्हा उंचावत आहे हे पाहून आनंद वाटल्याचे ठिपसे यांनी नमूद केले.

अपेक्षेच्या विपरीत निकाल

यंदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अपेक्षेपेक्षा विपरीत निकाल लागल्याचे ठिपसे म्हणाले. ‘‘जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कार्लसन आणि विद्यमान जगज्जेता दोम्माराजू गुकेश या स्पर्धेच्या गुणतालिकेत तळाला आहेत. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला गेलेला व्हिन्सेन्ट केमेर शेवटून तिसर्‍या स्थानावर आहे. खेळाडूंची रेटिंग आणि प्रत्यक्ष कामगिरी यात बरीच तफावत आहे. अन्य खेळाडूही या आघाडीच्या आणि नामांकित खेळाडूंना केवळ टक्कर नाही, तर मात देऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे.

पूर्वी कार्लसनला एकदा हरवणेही अवघड होते. आता प्रज्ञानंदने त्याला दोनदा पराभूत केले आहे. हेच बदलत्या युगाचे प्रतीक आहे,’’ असे ठिपसे म्हणाले. तसेच प्रज्ञानंदने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळवले असले, तरी त्याच्या खेळात सुधारणेला वाव असल्याचे ठिपसे यांना वाटते. जागतिक अजिंक्यपदाच्या पुढील चक्रात त्याने आव्हानवीर बनण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.